आपण हे नेहमीच ऐकत असतो की, डॉक्टर हे देवाचं रूप असतात. पण अनेकदा असंही बघायला मिळतं की त्यांच्याकडूनही चुका होतात. काही डॉक्टर तर इतके बेजबाबदार असतात की, त्यांच्या चुकीची शिक्षा रूग्णांना भोवागी लागते. अशीच एक घटना समोर आली आहे. एक रूग्ण डाव्या पायाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. पण डॉक्टरने त्या रूग्णाचा चुकून उजवा पाय कापला.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना आहे ऑस्ट्रियातील. इथे डॉक्टरने एका रूग्णाच्या चुकीच्या पायाचं ऑपरेशन करून पाय कापला. दुसऱ्या दिवशी नर्स रूग्णाच्या पायाचं ड्रेसिंग करत होती तेव्हा या प्रकाराचा खुलासा झाला. ऑस्ट्रियाच्या फ्रीस्टेंड क्लीनिकमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरने चुकून रूग्णाच्या दुसऱ्या पायाची सर्जरी केली. रूग्णाच्या डाव्या पायात वेदना होत होत्या म्हणून हॉस्पिटलमध्ये आला होता.
जेव्हा नर्सला या चुकीबाबत लक्षात आलं तेव्हा तिने लगेच हायर अथॉरिटीला याची माहिती दिली. पूर्ण घटना जेव्हा समोर आली तेव्हा हॉस्पिटलने आपली चूक मान्य केली. हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं की, ज्या व्यक्तीचा पाय कापला गेला त्यांचं वय ८२ वर्षे आहे. या चुकीमुळे झालेल्या नुकसानाची जबाबदारी हॉस्पिटल घेणार आहे.
डॉक्टरच्या एका चुकीची शिक्षा वयोवृद्ध रूग्णाला भोगावी लागत आहे. कारण त्याची पायाची समस्या दूर झालेली नाही. ती तशीच आहे. आता त्यांचा दुसरा पाय सुद्धा गुडघ्या खालून कापावा लागणार आहे.
अनेकांना प्रश्न पडला असेल की, डॉक्टर इतकी मोठी चूक कशी करू शकतात. याची चौकशी सुरू आहे. असे सांगितलं जात आहे की, ऑपरेशन थिएटरमद्ये घेऊन जाण्याआधी रूग्णाच्या चुकीच्या पायावर निशाण करण्यात आलं होतं. ज्यामुळे डॉक्टरने निशाण असलेल्या पायाचं ऑपरेशन केलं. आता या रूग्णाला दोन्ही पायांविना आयुष्य जगावं लागेल.