प्रश्न: नॉन इमिग्रंट व्हिसावर अमेरिकेत असताना मी वाहतूक नियमांचं उल्लंघन (डीयूआय) केलं. आता मला व्हिसाचं नुतनीकरण करायचं आहे. डीआययूचा परिणाम माझ्या पात्रतेवर होईल का? (DUI affect eligibility for US visa)उत्तर: ड्रायव्हिंग अंडर द इन्फ्लुएन्सचा (डीयूआय) परिणाम तुमच्या भविष्यातील व्हिसा प्रक्रियेवर आणि पात्रतेवर होऊ शकतो.गेल्या पाच वर्षांत डीयूआयमुळे तुम्हाला अटक झाली असल्यास किंवा गुन्हा सिद्ध झाला असल्यास अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्याच्या कलम २२१ (जी) अंतर्गत तुमचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला अमेरिकन सरकार प्रमाणित चिकित्सकांकडे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात येतं. ते तुमच्या मानसिक आरोग्याचं मूल्यमापन करतात. डॉक्टरांनी नोंदवलेल्या निरीक्षणावरून दुतावासातील अधिकारी पात्रतेबद्दलचा निर्णय घेतात.एका डीयूआयमध्ये दोषी ठरल्यानं अमेरिकेतील प्रवेश नाकारला जाईलच असं नाही. मात्र याबद्दलचा निर्णय पूर्णपणे दूतावासातील अधिकाऱ्यांवर अवलंबून असतो. न्यायालयातील सर्व नोंदींची माहिती घेऊन अधिकारी याबद्दलचा निर्णय घेतात. एकापेक्षा अधिक डीयूआयमध्ये दोषी आढळल्यास किंवा विविध गुन्ह्यांमध्ये अपराध सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्ती व्हिसासाठी अपात्र ठरू शकते. अशा व्यक्तीला अमेरिकेत प्रवेश करण्याआधी सवलत मिळवावी लागते.डीयूआयमध्ये अटक करण्यात आलेल्या किंवा दोषी ठरलेल्या व्यक्तीचा व्हिसा रद्द करणं राज्य विभागाला बंधनकारक आहे. राज्य विभाग एखाद्या व्यक्तीला दिलेला व्हिसा मागेदेखील घेऊ शकतं. पण तुम्ही नवा डीएस-१६० व्हिसा अर्ज दाखल केल्यास आणि त्यानंतर मुलाखतीसाठी दूतावास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहिल्यास तुम्हाला व्हिसासाठी अर्ज करण्याची संधी मिळू शकते.
US Visa: डीयूआयचा परिणाम अमेरिकन व्हिसासाठीच्या पात्रतेवर होतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 4:39 PM