जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:18 PM2024-11-19T12:18:20+5:302024-11-19T12:19:13+5:30
जो बायडेन यांनी जाताजाता एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
America Donald Trump : काही दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. जानेवारी महिन्यात त्यांचा शपथविधी होणार असून, त्यांनी आपले मंत्रिमंडळही तयार केले. पण, आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर आता ट्रम्प यांच्या मुलाचे वक्तव्य चर्चेत आहे.
डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी बायडेन सरकारवर 20 जानेवारी रोजी वडिलांची शपथ घेण्यापूर्वीच तिसरे महायुद्ध सुरू करण्यासाठी जागतिक तणाव वाढवल्याचा आरोप केला आहे. बायडेन सरकारने युक्रेनला रशियाविरुद्ध अमेरिकेची लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अमेरिका आणि रशियामधील तणाव वाढू शकतो.
The Military Industrial Complex seems to want to make sure they get World War 3 going before my father has a chance to create peace and save lives.
— Donald Trump Jr. (@DonaldJTrumpJr) November 17, 2024
Gotta lock in those $Trillions.
Life be damned!!! Imbeciles! https://t.co/ZzfwnhBxRh
रिपोर्ट्सनुसार, युक्रेन रशियावर ही क्षेपणास्त्रे डागण्याच्या तयारीत असताना उत्तर कोरियाने कुर्स्क भागात 15,000 हून अधिक सैन्य तैनात केले आहे. त्यामुळे हा तणाव आणखी वाढला आहे. अशातच, बायडेन सरकारच्या या निर्णयानंतर ट्रम्प जूनियर यांनी 18 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केले की, माझे वडील शांतता आणि एकोपा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यापूर्वीच अमेरिकन सरकारला तिसरे महायुद्ध सुरू करायचे आहे.
काय आहे बायडेन यांचा निर्णय?
जो बायडेन यांनी आपले पद सोडण्यापूर्वी युक्रेनला रशियाच्या आत हल्ले करण्यासाठी अमेरिकन बनावटीची शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आता युक्रेनचे सैनिक आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टीम किंवा एटीएसीएमएस वापरण्यास सक्षम असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन येत्या काही दिवसांत रशियावर लांब पल्ल्याचे हल्ले करण्याचा विचार करत आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी पदभार स्वीकारण्यापूर्वी बायडेन सरकारने हे पाऊल उचलले आहे.
अमेरिकेच्या या पाऊलामुळे वॉशिंग्टन आणि कीवमधील तणाव वाढला आहे. बायडेन प्रशासनाचे हे पाऊल युद्ध आणखी वाढवेल, असा इशारा रशियन खासदारांनी दिला. रशियन खासदार व्लादिमीर झाबरोव्ह यांनी म्हटले आहे की, तिसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.