ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - सिक्किमजवळील डोकलामच्या मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनला जाणार आहेत. चीनमध्ये ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक होणार असून या बैठकीला डोवाल उपस्थित राहणार आहेत. डोवाल चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत सीमाप्रश्नावर चर्चा करण्याची शक्यता आहे.चीनने 8 जून रोजी डोकलाम भागात रस्त्याचे काम सुरू करण्याच्या उद्देशाने घुसखोरी केली होती. डोकलाम हा भाग भूतानच्या अंतर्गत असला तरी भारत आणि भूतान या दोन्ही देशांनी चीनच्या घुसखोरीवर आक्षेप घेतला. चीनने तर भारताचा दावा खोडून काढत भारतानेच येथे हस्तक्षेप केल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे भारतीय सैन्य पुन्हा भारताच्या सीमेत गेल्याशिवाय कैलास मानस सरोवर यात्रेसाठी भक्तांना परवानगी देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
तर काश्मीरमध्ये चिनी सैन्य घुसवू - पाकिस्तानने हस्तक्षेपाची विनंती केल्यास पाकिस्तानच्या दिशेने तिसऱ्या देशाचे सैन्य काश्मिरात घुसखोरी करू शकते, असा इशारा देत आम्हीच तेथून काश्मीरमध्ये घुसू, असे चीनच्या सरकारी माध्यमांनी सूचित केले आहे. सिक्किमजवळील डोकलामच्या मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच चीनने प्रथमच या वादात काश्मीरमध्ये घुसण्याची अप्रत्यक्ष भाषा सुरू केली आहे. चीनने तिसऱ्या देशाचे सैन्य असा उल्लेख केला असला तरी त्या देशाची स्वत:च तिथून काश्मिरात घुसण्याची तयारी असल्याचे मानले जाते.
भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केलेले नाही - चीन
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) आमच्या सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप भूतानने केला होता. आमचे सैन्य ‘चीनच्या भूभागातच’ तैनात असून भारताने ‘स्वत:च्या चुका’ दुरुस्त करून घ्याव्यात, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले. चीनच्या सैनिकांनी भुतानच्या भूभागात प्रवेश केल्याचे तुमचे म्हणणे मला दुरुस्त करायचे आहे. चीनचे सैनिक चीनच्याच भूभागात तैनात आहेत, असे हा प्रवक्ता प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला. भारताच्या सैनिकांनी सिक्कीम सेक्टरमधील डोंगलोंग भागातील चीनच्या बाजूकडून प्रवेश केल्याचा आरोपही त्याने केला. भारतीय जवानांनी नित्याची कामे थांबवण्याचा प्रयत्न केला. चीनने स्वायत्तता सुरक्षित राखणे आणि भूभागाची एकात्मता जपण्यासाठी या कामांना योग्य तो प्रतिसाद दिला, असेही त्याने म्हटले. भारताने केलेल्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करून घ्याव्यात आणि चीनच्या भूभागातून सगळ्या सैनिकांना काढून घ्यावे, असे आम्ही स्पष्ट केले आहे, असे प्रवक्ता म्हणाला.