लंडन : १९ एप्रिलपर्यंतच्या सहा आठवड्यांत म्हणजेच जवळपास १०० दिवसांत लंडनमध्ये कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी ४०९३ लोकांना अटक करण्यात आली आहे. महानगर पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, ९ मार्चपासून म्हणजेच कोरोनाचा प्रसार होऊ लागल्यानंतर लोक घरात थांबत आहेत. या काळात हिंसाचाराच्या घटनांत २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. लंडनमध्ये कौटुंबिक हिंसाचारात दोन हत्या झाल्या आहेत. पूर्व लंडनमध्ये एका गर्भवती महिलेला तिच्या पतीने मारहाण केली. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शहराच्या विविध भागांत अशा घटना घडत आहेत.ब्रिटिश संसद सदस्यांच्या एका संसदीय समितीनेही लॉकडाऊनच्या काळात हिंसाचाराच्या घटना वाढल्याचे म्हटले आहे. समितीचे अध्यक्ष येवेट कूपर यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात घरात थांबणे अत्यावश्यक आहे; पण काही लोकांसाठी घर सुरक्षित नाही.कौटुंबिक हिंसाचारात वाढ हे काळजीचे संकेत आहेत. याबाबत सरकारने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. ब्रिटनच्या गृहमंत्रीप्रीती पटेल यांनी अलीकडेच ‘यू आर नॉटअलोन’ या हॅशटॅगने एक अभियान सुरू केलेहोते. (वृत्तसंस्था)
ब्रिटनमध्ये कौटुंबिक हिंसाचार वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 4:20 AM