अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर पोर्नस्टारला गप्प राहण्यासाठी दबाव आणण्यासह एकूण ३४ आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपांवर मंगलावीर मॅनहॅटन कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी ट्रम्प यांनी आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा केला. तसेच २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहता येऊ नये म्हणून आपल्याला चुकीच्या पद्धतीने फसवण्यात येत असल्याचाही आरोप केला.
दरम्यान, सुनावणी वेळी कोर्टाने ट्रम्प यांना सोशल मीडियावर समर्थकांच्या भावना भडकतील, असे काहीही न बोलण्याची ताकीद दिली आहे. जर त्यांनी असं काही केलं तर त्यांच्या सार्वजनिकपणे काहीही लिहिण्याबोलण्यावर बंदी घालण्यात येईल, असे सांगितले.
न्यूयॉर्कच्या जिल्हा अॅटॉर्नी एल्विस ब्रेग यांनी कोर्टामध्ये सुनावणीनंतर सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एकूण ३४ खोट्या वक्तव्यांवरून खटला दाखल करण्यात आला आहे. जर कोर्टाने ट्रम्प यांना सर्व आरोपंमध्ये दोषी मानले, तर त्यांना १३६ वर्षांची शिक्षा होऊ शकते. कारण सर्व गुन्ह्यांची शिक्षा एकत्र केल्यास ती १३६ वर्षे एवढी होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी पोर्नस्टार स्टार्मी डेनियल हिच्यासोबत रात्र घालवल्यानंतर तोंड बंद ठेवण्यासाठी १.३ लाख डॉलर दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय प्लेबॉय मॉडेल करेन मॅकडॉगल हिला नकारात्मक वृत्तांकन न करण्यासाठी १.१५ लाख डॉलर दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. एकंदरीत ट्रम्प यांच्यावर एकूण ३४ आरोप ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, मंगळवारी मॅनहॅटन जिल्हा अॅटॉर्नींच्या कार्यालयातून ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्याही फौजदारी प्रकरणामध्ये कुठल्याही माजी राष्ट्राध्यक्षांवर अटकेची कारवाई झाली आहे. ट्रम्प मॅनहॅटनमधील कोर्टामध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचले होते. तेव्हा त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली.