अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. एका अमेरिकी ज्युरींनी मंगळवारी देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेती एका पत्रकाराचं लैंगिक शोषण आणि मानहानी प्रकरणात जबाबदार धरले. तसेच त्यांना ५ दशलक्ष डॉलर (सुमारे ४१० कोटी रुपये) एवढ्या दंडाची शिक्षा सुनावली. सुनावणीदरम्यान, नऊ ज्युरी सदस्यांनी ई. जीन कॅरलच्या बलात्काराच्या आरोपांना फेटाळून लावले. मात्र तीन तासांहून कमी वेळ विचार विनिमय केल्यानंतर सिव्हिल ट्रायलमध्ये त्यांच्या अन्य तक्रारी कायम ठेवण्यात आल्या.
ट्रम्प यांच्याविरोधातील खटल्यांमध्ये निकाल देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्र्म्प यांनी अनेक वर्षे जुने लैंगिक शोषणाचे आरोप आणि एक डझनभर महिलांशी संबंधित कायदेशीर प्रकरणांचा सामना केलेला आहे. कॅरलने या प्रकरणी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच कॅरने केलेले आरोप हे मानहानिकारक आहेत, हे ट्रम्प यांनी केलेलं विधान मागे घेण्याची मागणी केली आहे.
अमेरिकन पत्रकार, लेखिका आणि स्तंभलेखक ई. जीन कॅरल (७९) यांनी गतवर्षी एप्रिल महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कोर्टात सुनावणीदरम्यान आरोप केला होता की, देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी एका लक्झरी डिपार्टमेंट स्टोअरमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. कॅरल यांनी सांगितले होते की, १९९६ मध्ये एका गुरुवारी संध्याकाळी मी बर्गडोर्फ गुडमेनमध्ये ट्रम्प यांना भेटले होते. तिथे ट्रम्प यांनी महिलांची अंत:वस्त्र खरेदी करण्यासाठी तिच्याकडे मदत मागितली होती. यादरम्यान, कपडे बदलत अशताना खोलीत नेऊन ट्रम्प यांनी आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप या महिलेने केला आहे.
त्यांनी सांगितले की, अनेक दशकांपर्यंत त्यांनी आपल्या दोन मित्रांना वगळून इतर कुणालाही ही गोष्ट सांगितली नव्हती. कारण ट्रम्प याचा बदला घेतील, अशी भीती तिला वाटत होती. तसेच तिच्यासोबत जे काही झालं, त्यासाठी लोक तिलाच दोषी ठरवतील, असंही कॅरलला वाटत होतं.