ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 8 - अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची उमेदवारी मिळाल्यापासून आपल्या बेताल आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे डोनाल्ड ट्रम्प नेहमी चर्चेत राहिले. यामुळे त्यांच्या विरोधातील मतप्रवाही निर्माण झाला. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष उमेदवारीतील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व ठरलं आहे. हिलरी क्लिंटनसारखा मातब्बर उमेदवार समोर असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं आव्हान मात्र कायम ठेवलं. चर्चेत, हेडलाईन्समध्ये कसं राहायचं याची चांगली माहिती डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाल्यापासून एक नवा राजकीय शब्द तयार झाला आहे...ट्रम्पिझम (TRUMPISM). डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्माण केलेल्या वादांच्या पार्श्वभुमीवर हा शब्द व्हायरल झाला.
ट्रम्पिझम म्हणजे काय ?
डोनाल्ड ट्रम्प यांचं वागणं, विचार करणं, शिष्टाचार यासंबंधी चर्चा करताना किंवा संबोधित करताना राजकीय विश्लेषकांकडून ट्रम्पिझम संज्ञा वापरली जाते.
ट्विटरवर ट्रम्पिझम हा ट्रेंडच सुरु झाला होता. आणि ज्याप्रकारे डोनाल्ड ट्रम्प दर दुस-या दिवशी वादग्रस्त वक्तव्य करत असत त्यानुसार तर हा ट्रेंड रोजच चालू असायचा.
डोनाल्ड ट्रम्प यांचे असे काही वाद -
मुस्लिमांवर बंदी घाला -
डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी आणण्याची मागणी केली होती. ओरलँडो येथील गे नाइट क्लबवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर सलग ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं मत मांडत मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याची मागणी केली होती. याआधीही त्यांनी एकदा हीच मागणी केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा जगभरातून निषेध करत रोष व्यक्त करण्यात आला. ब्रिटन संसदेत तर ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.
महिलांचा लैगिंक छळ वक्तव्य -
वॉशिंग्टन पोस्टने डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ रिलीज केला होता ज्यामध्ये ट्रम्प महिलांच्या लैगिंक छळावर बढाई मारत होते. 'मी आपोआप सुंदर महिलांकडे आकर्षित होतो, मी त्यांना किस करायला सुरुवात करतो. हे चुंबकाप्रमाणे आहे. किस करण्यासाठी मी वाट पाहत बसत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्टार असता तेव्हा तर तुम्ही काहीही करु शकता, कोणी आडवू शकत नाही,' असं ट्रम्प बोलले होते.
आपली मुलगी 'आकर्षित' वाटते -
ट्रम्प यांनी आपल्या मुलीलाही वादात ओढत ती आकर्षित वाटत असल्याचं म्हटलं होतं. ट्रम्प यांनी एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत इवांका ट्रम्पवर वक्तव्य केलं होतं. सीएनएनने हे वक्तव्य प्रसारित केलं होतं. 'ती नेहमी आकर्षित वाटते. ती 6 फूट उंच आणि खूप सुंदर आहे,' असं ट्रम्प बोलले होते. आपल्याच मुलीसंबंधी केलेल्या अशा वक्तव्यामुळे ट्रम्प यांना टिकेला सामरे जावं लागलं होतं.
अपंग पत्रकाराची थट्टा -
अपंग पत्रकाराची नक्कल केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका झाली होता. मात्र आपण असं काही केलंच नाही सांगत ट्रम्प यांनी घटनेचा नकार दिला होता.
अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये मोठी भिंत बांधण्याचा मानस -
अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये मोठी भिंत बांधण्याचा आपला मानस आहे, जेणेकरून मेक्सिकन आणि सीरीयन शरणार्थी अमेरिकेत येणार नाहीत असं ट्रम्प बोलले होते. मेक्सिकोमधील स्थलांतरितांना बलात्कारी आणि हत्यारे संबोधत ट्रम्प यांनी नवा वाद निर्माण केला होता. सीमारेषेची सुरक्षा करणे सार्वभौम हक्क असून दोन्ही देशांच्या फायद्याचं आहे असं ट्रम्प बोलले होते.
हिलरी इसीसच्या संस्थापक -
हिलरी यांचा विजय ओबामा सरकारसाठी 4 वर्ष वाढवण्यासोबत इसीसचाही प्रसार वाढवेल असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं. 'जर हिलरी क्लिंटन निवडून आल्या तर ओबामा सरकारला अजून 4 वर्ष झेलावं लागेल. यामुळे आपत्ती निर्माण होईल आणि सगळीकडे इसीसचा प्रसार होईल', असं ट्रम्प बोलले होते.