वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांच्यातील बहुप्रतीक्षित भेटीची वेळ अखेर निश्चित झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन 12 जून रोजी सिंगापूर येथे भेटणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून या भेटीचा माहिती दिली आहे. 12 जून रोजी मी आणि किम जोंग उन सिंगापूर येथे भेटणार आहोत. आम्ही या भेटीला जागतिक शांततेच्या दृष्टीकोनातून खास बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, असे ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याआधी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि आपली बैठक उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर स्थित अशेल्या पीस हाऊसमध्ये होऊ शकते, अशी शक्यता ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी वर्तवली होती. मात्र त्या मुद्यावर एकमत होऊ शकले नव्हते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि दक्षिण कोरियाचे हुकूमशाह यांच्यातील ही पहिलीच शिखर बैठक असेल. त्यामुळे या भेटीकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचा हुकूम शाह किम जोंग उन याने दक्षिण कोरियाचा दौरा केला होता. त्यावेळी दोऩ्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कोरियन द्विपकल्पात असलेला तणाव निवळण्यास मदत झाली होती. किमच्या दक्षिण कोरिया दौऱ्याकडे एक ऐतिहासिक घटना म्हणून पाहिले गेले होते. कारण त्याआशी शस्त्रसज्जता वाढवण्यात गुंतलेल्या किमने दक्षिण कोरियाच नव्बहे तर अमेरिकेलाही हल्ले करण्याची धमकी दिली होती. मध्यंतरी उत्तर कोरियात किम यांनी ज्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या, त्यामुळे सारे जग हादरून गेले होते. अमेरिकेने उत्तर कोरियावर निर्बंधही जाहीर केले होते. मात्र, चीनच्या मध्यस्थीनंतर किम यांनी चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण कोरियातही जाण्याचे ठरवले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग ऊन यांच्यातील भेटीचा मार्ग त्यामुळे खुला झाला होता.
डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या भेटीची वेळ ठरली, 12 जून रोजी सिंगापूरमध्ये होणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 8:46 AM