वॉशिंग्टन - एखादी महत्त्वाची चर्चा करत असताना किंवा एखादी महत्त्वाची बैठक सुरू असताना एखाद्याला अचानक खोकला किंवा शिंका आल्याचा अनुभव तुम्हाला अनेकदा आला असेल. पण महत्त्वाची मुलाखत सुरू असताना खोकत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी व्हाइट हाऊसमधील एका बड्या अधिकाऱ्याला ऑफीसमधून बाहेरची वाट दाखवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. त्याचे झाले असे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एका वाहिनीला मुलाखत देत होते. व्हाइट हाऊसमधील कार्यालयात या मुलाखतीचे चित्रिकरण सुरू होते. यादरम्यान, तिथे उपस्थित असलेले व्हाइट हाऊसचे चिफ ऑफ स्टाफ मिक मुलवाने यांना खोकला येऊ लागला. ट्रम्प यांनी त्याकडे एकदा दुर्लक्ष केले. मात्र काही वेळाने त्यांना पुन्हा खोकला आला. त्यानंतर वैतागलेल्या ट्रम्प यांनी मुलवाने यांना ऑफीसमधून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर मुलाखतीस पुन्हा एकदा सुरुवात झाली. दरम्यान, ट्रम्प यांची ही मुलाखत रविवारी संबंधित वाहिनीवर प्रसारित झाली. या मुलाखतीत ट्रम्प यांनी माजी राष्ट्रपती बराक ओबामा, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अशा विविष विषयांसंबंधिच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
खोकला आला म्हणून ट्रम्पनी अधिकाऱ्याला ऑफिसमधून बाहेरचा रस्ता दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 10:07 PM