डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. जर ते या नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष झाले तर ते टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना कॅबिनेट पद किंवा व्हाईट हाऊसमध्ये सल्लागार हे पद देऊ शकतात असं जाहीर केलं आहे. एलन मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर डोनाल्ड ट्रम्प यांची मुलाखत घेतली होती. याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्या कारचे कौतुक केलं होतं आणि ते उत्कृष्ट प्रोडक्ट बनवतात असं म्हटलं होतं.
द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, मस्क यांनी यापूर्वी २०२० च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना पाठिंबा दिल्याचं सांगितलं होतं. मात्र यावेळी ते डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत आहेत. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. "मी ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा देतो आणि ते लवकरात लवकर बरे होण्याची आशा करतो" असं म्हटलं होतं.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर ते निवडणूक जिंकले तर ते इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी $7,500 टॅक्स क्रेडिट काढून टाकण्याचा विचार करतील. याशिवाय ते टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना कॅबिनेटमध्ये किंवा सल्लागार हे पदही देऊ शकतात.
यॉर्क, पेनसिल्व्हेनिया येथील प्रचारादरम्यान ते म्हणाले की, टॅक्स क्रेडिट्स आणि टॅक्स इन्सेंटिव्ह ही चांगली कल्पना नाही. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचं कौतुक करताना ते त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात नक्कीच स्थान देतील. ते एक अतिशय हुशार व्यक्ती आहेत असं सांगितलं. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्या या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फोर्ब्सनुसार मस्क सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.