वॉशिंग्टन- जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून अमेरिकत याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्याप कोणतेही योग्य उपचार किंवा लस सापडली नाही. मात्र, कोरोना रूग्णांमध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे चांगले परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन रेडक्रॉसच्या मुख्यालयाला भेट देऊन कोरोना रुग्णांना आवाहन केले. ते म्हणाले, "माझे प्रशासन कोरोना व्हायरसवर उपचार शोधण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आपण कोरोनापासून बरे झाले असल्यास, प्लाझ्मा दान करा. जेणेकरून जीव वाचू शकतील. एकत्र मिळून आम्ही या व्हायरसचा पराभव करू."
कोरोनावरील संशोधनात असे दिसून आले आहे की, कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी खूप उपयुक्त ठरली आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे सौम्य लक्षणं असलेले कोरोनाचे रुग्ण पाच दिवसांत बरे होत आहेत. मात्र, गंभीर आजारी असलेल्या कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यात प्लाझ्मा थेरपी अपयशी ठरत आहे. गंभीर रूग्णांमध्ये ज्या रुग्णांचे अवयव कार्य करत नाहीत. ज्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते, अशा रुग्णांचा समावेश आहे
अमेरिकेत आतापर्यंत ४६.२९ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी १.५५ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २२ लाखाहून अधिक लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. अमेरिकेत सध्या कोरोनाचे २१.९७ लाखांहून अधिक रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक टळणार?अमेरिकेत या वर्षाच्या शेवटी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणे अपेक्षित आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक पुढे ढकलावी, असा सल्ला दिला आहे. हा सल्ला देताना, निवडणुकीत मेल इन सिस्टिमने मतदान होणार आहे. असे असताना ही अमेरिकेच्या इतिहासात सर्वात चुकीची आणि फसवा-फसवीची निवडणूक ठरेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी या निवडणुकीत मतदानादरम्यान घोटाळा होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.