अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनियामध्ये एका प्रचारसभेदरम्यान हल्ला झाला. हल्ला होताच यूएस सीक्रेट सर्व्हीस एजन्ट्स सावध झाले आणि त्यांनी ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवले. तसेच प्रत्युत्तरात कारवाई करत स्नायपरने हल्ला करणाऱ्या हल्लेखोरालाही जागीच ठार केले. या हल्लेखोराचे नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स (Thomas Matthew Crooks) असे होते. तो २० वर्षांचा होता. थॉमसचा हल्ल्यापूर्वीचा एक व्हिडिओही आता समोर आला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा व्हिडिओ खुद्द थॉमसने जारी केला आहे.
थॉमसने ट्रम्प यांच्यावर का चालवली गोळी? काय आहे व्हिडिओमध्ये? -डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळी चालवणाऱ्या थॉमस मॅथ्यू क्रूक्सने हल्ला करण्यापूर्वी स्वतःच एक व्हिडिओ जारी केला होता आणि यात त्याने हल्ल्याचे कारणही सांगितले होते. व्हिडिओमध्ये थॉमसने म्हटले आहे, "आपण रिपब्लिकन पक्षाचा द्वेष करतो, आपण डोनाल्ड ट्रम्प द्वेष करतो." यावरू, थॉमसने द्वेषापोटीच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला केला होता, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावरून चालवली होती गोळी -डोनाल्ड ट्रम्प ज्या व्यासपीठावरून भाषण देत होते, त्या व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावर असलेल्या एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या छतावरून हल्लेखोराने गोळीबार केला. बटलर फार्म शोग्राऊंडवर डोनाल्ड ट्रम्प यांचे ओपन-एअर कँपेन आयोजित करण्यात आली होती. येथे एवढी मोकळी जागा होती की, स्नायपरला निशाणा साधण्यात कसल्याही प्रकारची अडचण आली नाही. हल्लेखोर आपल्या जागेवरून ट्रम्प यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय स्पष्टपणे बघू शकत होता.