वॉशिंग्टन :कमला हॅरिस या जर निवडून आल्या, तर त्या अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत कट्टर उदारमतवादी अध्यक्ष असतील, अशा शब्दांत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅरिस यांना लक्ष्य केले.
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यावर हल्ला तीव्र करत म्हटले आहे की, अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात अक्षम, अलोकप्रिय आणि अत्यंत डाव्या विचारसरणीच्या त्या उपाध्यक्ष आहेत. स्थलांतरीत लोक आणि गर्भपाताच्या मुद्द्यावर त्या अत्यंत उदारमतवादी असल्याचे ते म्हणाले. आमचे काम समाजवादाचा पराभव करणे, मार्क्सवादाचा, साम्यवादाचा पराभव करणे तसेच गुन्हेगार आणि मानवी तस्कर, महिला तस्कर यांचा पराभव करणे हे आहे, असेही त्यांनी म्हटले.
कमला हॅरिस यांनी अधिकृतपणे उमेदवारी केली जाहीर
उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी शनिवारी त्यांच्या फॉर्मवर स्वाक्षरी करून राष्ट्राध्यक्षपदासाठी अधिकृतपणे उमेदवारीची घोषणा केली. ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपण विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतीय-आफ्रिकन वंशाच्या कमला हॅरिस (५९) यांनी एक्सवर याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, प्रत्येक मत मिळवण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन.