अमेरिकेचे वादग्रस्त माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील निवासस्थानावर एफबीआयने छापेमारी केली आहे. ट्रम्प यांनी स्वत: या छाप्याची माहिती दिली आहे. तिजोरी देखील फोडल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
पाम बीचवर असलेल्या मार ए लागोवर एफबीआयने छापा टाकून ते सील केले आहे. राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत कागदपत्रांसाठी एफबीआयने ही रेड मारल्याचे सांगितले जात आहे. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ट्रम्प यांनी ही कागदपत्रे फ्लोरिडाला नेली होती. मार ए लागो हे एक पाम बीचवरील मोठे रिसॉर्ट आहे. येथेच ट्रम्प यांचे निवासस्थान आहे, तसेच कार्यालयही आहे.
अमेरिकेसाठी हा काळा दिवस आहे. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबाबत असे घडले नव्हते. तपास यंत्रणांना सहकार्य करूनही असे छापे टाकण्यात आले. न्याय व्यवस्थेचा शस्त्र म्हणून गैरवापर करण्यासारखे आहे. हा कट्टर डाव्या डेमोक्रॅट्सचा हल्ला आहे. त्यांना मी 2024 मध्ये अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभा राहणे नको आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
अधिकारी ट्रम्प यांचे कार्यालय आणि वैयक्तिक निवासस्थानांवर लक्ष केंद्रित करून शोध घेत आहेत. न्याय विभाग आणि व्हाईट हाऊसने या प्रकरणी कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. या कारवाईवेळी ट्रम्प फ्लोरिडामध्ये नसल्याचे सांगितले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात न्याय विभाग दोन प्रकरणांची चौकशी करत आहे. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्याच्या प्रयत्नाशी संबंधित पहिले प्रकरण आणि कागदपत्रे हाताळण्यासंदर्भात दुसरे प्रकरण. एप्रिल-मे महिन्यातही तपास यंत्रणेने याप्रकरणी ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील जवळच्या मित्रांची चौकशी केली होती.