वॉश्गिंटन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे पडसाद भारतात उमटू लागले आहेत. ज्यो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अमेरिकेत कडवी लढत आहे. या निवडणुकीत बाजी कोण मारतं याकडे सर्व जगाचे लक्ष आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने जगाचा नकाशा प्रसिद्ध करत वडील डोनाल्ड ट्रम्प आणि प्रतिस्पर्धी ज्यो बायडन यांच्या समर्थक देशांना दोन रंगात विभागलं आहे. मात्र यात भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
या नकाशामध्ये लाल रंगात डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडनचे समर्थन करणारे देश निळ्या रंगात दाखवण्यात आले आहेत. या फोटोमध्ये काश्मीर हा पाकिस्तानच्या भागाचा भाग म्हणून भारताच्या नकाशावर दाखविण्यात आला आहे. तसेच, बायडनला पाठिंबा देणार्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. ट्रम्प यांचे समर्थक म्हणून पाकिस्तान, रशिया आणि इराण यांचा उल्लेख करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी ट्विट करत म्हटलंय की, “बरोबर, मी अंदाज लावलेला निवडणुकीचा नकाशा तयार झाला आहे”
डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतावर निशाणा साधला
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चांगले संबंध आहेत. असे असूनही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटच्या अध्यक्षीय चर्चेत पर्यावरणाच्या मुद्यावरुन भारताला लक्ष्य केले. हवामान बदलांवर भाष्य करताना ते म्हणाले की, चीन आणि रशिया व्यतिरिक्त, हवा खराब करण्यासाठी भारतच जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.
लडाखमध्ये चीनशी झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेत जवळीक वाढत आहे. या दोन्ही देशांच्या नौदलाने सध्या ऑस्ट्रेलिया आणि जपानबरोबर लष्करी सराव सुरु केला आहे. यावेळी अमेरिका चीनविरूद्ध भारताच्या बाजूने उभे असल्याचा दावा करत आहे.
दरम्यान, अमेरिकेत ४५ व्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे मतदान संपलं आहे. या शक्तीशाली पदासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आमने-सामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकली, तर ते सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे चौथे व्यक्ती ठरतील.
अर्कांससमध्ये ट्रम्प विजयी
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अर्कांसस राज्यातही विजय मिळवला आहे. ट्रम्प यांना येथे ६ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. अर्कांसस हे एक शक्तिशाली रिपब्लिकन राज्य आहे.
ट्रम्प ४, तर बायडन ७ राज्यांत विजयी
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलबामा, मिसिसिपी, ओक्लाहोमा आणि टेनेसी राज्यात विजय मिळवला आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन यांनी कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मॅरीलँड, मॅसाचुसेट्स, न्यू जर्सी आणि रोड आयलँडमध्ये विजय मिळवला आहे. ट्रम्प यांना त्या चार राज्यांतून ३३ मते मिळाली तर बायडन यांना सात राज्यांतून एकूण ६९ मते मिळाली आहेत.