वॉशिंग्टन : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल जवळपास जाहीर झाले असून सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने वरिष्ठ सभागृहात बहुमत राखले आहे. तर कनिष्ठ सभागृहात विरोधी पक्ष डेमॉक्रेटीकने बहुमताचा आकडा गाठला असून यामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी पुढील वाटचाल खडतर असणार आहे.
अमेरिकेमध्ये काल मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान झाले. वरिष्ठ सदनातील (सीनेट) 100 पैकी 35 जागा आणि कनिष्ठ सदनामध्ये (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) 435 जागांवर खासदार निवडले गेले. काही जागांचे निकाल अद्याप यायचे असले तरीही बहुमताचा आकडा दोन्ही सभागृहात पार झाला आहे. सीनेटमध्ये 100 पैकी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने 51 जागा जिंकत वर्चस्व कायम राखले आहे. मात्र, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये ट्रम्प प्रशासनाला नामुष्की सहन करावी लागली आहे. डेमॉक्रेटीक पक्षाने बहुमताचा 218 हा आकडा पार केला असून ट्रम्प यांना 193 जागा मिळाल्या आहेत. अद्याप काही जागांचे निकाल यायचे आहेत.
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही अशाच अडचणीला सामोरे जावे लागले होते. त्यांची महत्वाकांक्षी योजना ओबामा केअरला कनिष्ठ सभागृहात डेमॉक्रेटीक पक्षाचे बहुमत नसल्याने माघार घ्यावी लागली होती. आता ट्रम्प प्रशासनावरही हीच वेळ येणार असून त्यांची ताकद कमी होण्याचे हे संकेत आहे.
दोन्ही सदनांमध्ये गेल्या 84 वर्षांत केवळ तीनवेळा एकाच पक्षाला वर्चस्व राखने शक्य झाले आहे.