नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले खोटे दावे किंवा चुकीचे वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय बनतो. आता तर त्यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने मदत मागितल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून जवळपास 8,158 चुकीची वक्तव्ये किंवा संभ्रम निर्माण होईल, असे दावे केले आहेत. अनेक मीडियाच्या रिपोर्टने यासंबंधी म्हटले आहे. तर अमेरिकेतील वृत्तपत्र 'वॉशिंग्टन पोस्ट'ने जानेवारी महिन्यात ट्रम्प प्रशासनाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक अहवाल प्रकाशित केला होता.
'वॉशिंग्टन पोस्ट'ने अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळातील पहिल्या वर्षी दररोज सरासरी सहा वेळा चुकीचे किंवा संभ्रम निर्माण करणारे दावे केले. तर दुसऱ्या वर्षी त्यांनी तीन पट जास्त दररोज जवळपास 17 दावे केले आहेत. अहवालात वॉशिंग्टन पोस्टने फॅक्ट चेकरच्या आकड्यांचा हवाला दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात येणाऱ्या संशयित वक्तव्यांचे विश्लेषण, वर्गीकरण आणि ते योग्य आहे की नाही, याबाबत पडताळून पाहण्याचे काम फॅक्ट चेकरकडून करण्यात येते. फॅक्ट चेकरच्या आकड्यांनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून आतापर्यंत 8,158 वेळा चुकीचे आणि संभ्रम निर्माण करणारे दावे केले आहे.
अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्र धोरणाबद्दल 900 चुकीचे दावे केले आहेत. तर व्यापार (854), अर्थव्यवस्था (790) आणि नोकऱ्यांबद्दल (755) खोटे दावे केले आहे. याशिवाय इतर प्रकरणात म्हणजेच मीडिया आणि आपल्या विरोधकांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास 899 चुकीचे दावे केले आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत, काश्मीर प्रश्नावर मोदींनी माझ्याकडे मदत मागितली होती. मलादेखील भारत आणि पाकिस्तानमधील या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास आवडेल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र ट्रम्प यांचा हा दावा भारताने स्पष्ट शब्दात फेटाळला आहे.