वॉशिंग्टन - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेला पाकिस्तान जगभरात भारताविरोधात षडयंत्र रचत आहे. पाक पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्री भारताविरुद्ध भडकाऊ विधाने करत आहेत. इतकचं नाही तर पाकिस्तानचे पत्रकारांनी भारताविरोधात मोहिम आखली आहे. एक असाच किस्सा सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बैठकीनंतर पाहायला मिळाला.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकार भारत आणि काश्मीरबाबत वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारत होते. यावरुन चिडलेल्या ट्रम्प यांनी पाकिस्तानला टोला लगावला तर इम्रान खान यांना विचारलं की, तुम्ही अशा पत्रकारांना कुठून घेऊन येता? पाकिस्तानी पत्रकार काश्मीर मुद्द्यावरुन वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत होते. त्यावरुन ट्रम्प यांनी त्यांची खिल्ली उडविली. पाकिस्तानचे पत्रकार ट्रम्प यांना काश्मीरमध्ये गेल्या 50 दिवसांपासून इंटरनेट सेवा, अन्न पुरवठा बंद आहे त्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकाराला विचारलं तुम्ही पाकिस्तानी शिष्टमंडळाचे सदस्य आहात का? तुम्ही जो विचार करत आहात तेच बोलताय. तुमचा हा प्रश्न नाही तर वक्तव्य आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे बघत तुम्ही अशा रिपोर्टरना कुठून आणता? असा सवाल केल्याने इम्रान खान यांचीही गोची झाली. दरम्यान, एका पाकिस्तान पत्रकाराने ट्रम्प यांना जर तुम्ही काश्मीर मुद्द्याचं समाधान कराल तर तुम्हाला नोबेल पुरस्काराचा मान मिळू शकतो असं सांगितले त्यावेळी ट्रम्प हे म्हणाले की, जर कोणताही पक्षपात न करता पुरस्कार मिळणार असेल तर मला अन्य गोष्टीसाठीही नोबेल पुरस्कार मिळू शकतो.
ट्रम्प यांनी इम्रान खान आणि त्यांच्या पत्रकारांसमोर हाउडी मोदी या मेगा शोचं कौतुक केलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 हजारांच्या गर्दीसमोर खूप चांगले आणि आक्रमक भाषण केले. दहशतवाद आणि दहशतवाद्यांना खतपाणी देणाऱ्यांविरोधात निर्णायक लढाई करण्याची वेळ आली आहे असं मोदी म्हणाले होते. तसेच भारत आणि पाकिस्ताननं काश्मीर प्रश्नावर तोडगा काढावा. दोन्ही देशांसाठी फायदेशीर असेल असा मार्ग काढून काश्मीर प्रश्न सोडवण्यात यावा, असं ट्रम्प म्हणाले. प्रत्येक समस्या सोडवली जाऊ शकते. समस्येतून मार्ग निघू शकतो असं म्हणत ट्रम्प यांनी भारत, पाकिस्तान काश्मीर प्रश्न सोडवतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.