'पुतिन यांना समजावून सांगा..', डोनाल्ड ट्रम्प यांचे चीनला रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2024 07:16 PM2024-12-08T19:16:28+5:302024-12-08T19:16:47+5:30
Donald Trump on China: चीनवर वारंवार टीका करणारे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
Donald Trump on China: चीनवर वारंवार टीका करणारे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. सीरियात बशर अल-असद यांचे सरकार कोसळल्यानंतर ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, रशियाने आता समजूतदारपणे वागावे. त्यांना कळायला हवे की, त्यांची आणि इराणची स्थिती कमकुवत झाली आहे. पुतिन यांना पटवून देण्यात चीन मदत करू शकतो.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, मी व्लादिमीर पुतीन यांना चांगले ओळखतो. त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आली आहे. चीन यामध्ये मदत करू शकतो. रशिया आणि इराण सध्या कमकुवत स्थितीत आहेत. एक युक्रेनविरोधातील युद्धामुळे आणि दुसरा वाईट अर्थव्यवस्थेमुळे. इस्रायलही युद्धात यश मिळवत आहे. झेलेन्स्कींना हा सर्व वेडेपणा थांबवायचा आहे. रशिया आणि इराण हे दोन्ही देश त्यांच्या सुरू असलेल्या युद्धांमुळे कमकुवत झाले आहेत. युक्रेनमधील युद्धात सुमारे 600,000 रशियन सैनिक जखमी किंवा ठार झाले आहेत. रशियानेही आता हे सर्व थांबवावे. हे युद्ध थांबवण्यासाठी चीन मदत करू शकतो, असेही ट्रम्प म्हणाले.
सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नये
सीरियात गृहयुद्धाची ठिणगी पडली आहे. यावर अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दूर राहण्याची भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी भूमिका मांडता म्हटले की, अमेरिकेने सीरियातील संघर्षामध्ये पडू नये. सीरिया एक समस्याग्रस्त देश आहे. पण, आमचा मित्र नाहीये. अमेरिकेला याच्याशी काही देणं घेणं नसले पाहिजे. ही आमची लढाई नाहीये. हे चालू द्याव, यात सहभागी होऊ नये, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.