Donald Trump on Gaza : गाझातील लोकांना इतर देशांमध्ये पाठवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला फ्रान्सने विरोध केला. इंडोनेशिया आणि स्पेननेही ही योजना नाकारली आहे. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, गाझामधील लोकांना जॉर्डन आणि इजिप्तमध्ये पाठवण्याची योजना आहे. या संदर्भात त्यांनी तेथील सरकारांशी चर्चाही केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच इस्रायल आणि गाझामध्ये युद्धविराम झाला असून, दोन्ही बाजूने ओलिसांची सुटका केली जात आहे.
गाझातील लोकांना इजिप्त आणि जॉर्डनमध्ये हलवण्याच्या प्रस्तावाचा फ्रान्सने कडाडून विरोध केला. फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने जोर दिला की, गाझातील लोकांचे कोणत्याही प्रकारे विस्थापन स्वीकारले जाणार नाही. अमेरिकेच्या या योजनेचा स्पेननेही निषेध केला होता. स्पेनचे परराष्ट्र मंत्री जोस मॅन्युएल अल्बार्स यांनी ब्रुस्पष्टपणे सांगितले की, गाझातील लोकांनी गाझामध्येच राहावे. गाझा पॅलेस्टाइनचा भाग आहे आणि त्यावर एकच सरकार चालले पाहिजे.
स्थलांतरित करण्यासाठी संभाव्य देशांमध्ये इंडोनेशियाचेही नाव!गाझाच्या 2 मिलियन लोकसंख्येला हलवण्याचा प्रस्ताव असलेल्या संभाव्य देशांमध्ये इंडोनेशियाचे नाव घेतले गेले. मात्र, इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला. या संदर्भात आपल्याला कधीही माहिती किंवा योजना मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. इंडोनेशियाने आपल्या विधानात पुनरुच्चार केला की, गाझामधील नागरिकांना इतर देशात हलवण्याचा कोणताही प्रयत्न अस्वीकार्य आहे.