अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारी रात्री पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीला संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या जीवघेण्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या बाजुला एक गोळी लागली. सीक्रेट सर्व्हिसने हल्लेखोराला जागीच ठार केलं. या घटनेत रॅलीसाठी आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.
या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ट्रम्प भाषण देत असताना गोळ्या झाडल्याचं दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प उजव्या हाताने आपला कान झाकतात आणि मंचाच्या खाली झुकतात. सीक्रेट सर्व्हिस एजंट लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचतात. ट्रम्प उठतात आणि रॅलीत आलेल्या लोकांकडे पाहून धैर्याचा संदेश देतात. त्यांच्या उजव्या कानावर आणि चेहऱ्यावर रक्त दिसत आहे. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"मी युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस आणि सर्व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींचे पेनसिल्व्हेनिया येथे झालेल्या गोळीबाराला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या रॅलीत मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती आणि गंभीर जखमी झालेल्या अन्य व्यक्तीच्या कुटुंबाप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. आपल्या देशातही असं कृत्य घडू शकतं, यावर विश्वास बसत नाही. हल्लेखोराबाबत सध्या काहीही माहिती नाही."
"माझ्यावर एक गोळी झाडण्यात आली होती जी माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला लागली होती. मी गोळीबाराचा आवाज ऐकला, मग मला लगेच कळलं की काहीतरी गडबड आहे. भीतीदायक आवाज ऐकू येऊ लागले. मला गोळी लागल्याचं जाणवलं. खूप रक्तस्त्राव झाला होता, तेव्हा मला वाटलं हे नेमकं काय होतंय" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. गोळीबार झाला तेव्हा हजारो ट्रम्प समर्थक रॅलीत उपस्थित होते. हा कार्यक्रम अमेरिकन वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह चालू होता.