वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या हत्येचे आदेश दिले होते, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. एकेकाळी वॉटरगेट कांड उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारे अमेरिकन पत्रकार बॉब उडवर्ड यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकामध्ये हा गौप्यस्फोट केला आहे. खळबळजनक दाव्यांमुळे हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. या पुस्तकामधून ट्रम्प यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणावरही व्हाइट हाऊसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने जोरदार टीका करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना जीवे मारण्याचे आदेश आपल्या संरक्षण सचिवांना दिले होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी असद यांच्यासाठी अपमानजनक शब्दांचा वापर केला होता, असा दावाही करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याशी झालेल्या संभाषणावेळी संरक्षण सचीव जेम्स मॅटीस यांनी आम्ही असे करू शकत नाही. आम्हाला संपूर्ण विचार करून पावले उचलावी लागतील, असे सांगितल्याचा उल्लेखही पुस्तकात आहेत. दरम्यान, व्हाइट हाऊसने हे पुस्तक काल्पनिक गोष्टींनी भरलेले असून, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचे आदेश?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 9:21 PM