वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेपेक्षा भारतात अधिक टॅक्स भरल्याचे वृत्त अमेरिकेतील वृत्तपत्राने दिले आहे. पुण्यातील पंचशील रिअॅलिटीशी झालेल्या करारानंतर हा कर भरण्यात आला, असेही यात म्हटले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने टॅक्स रिटर्नची आकडेवारी देत ही माहिती समोर आणली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत केवळ ७५० डॉलरचा कर भरला. तर, भारतात यापेक्षा अधिक म्हणजे १,४५,४०० डॉलरचा कर भरल्याचे यात म्हटले आहे. मात्र, अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. कायद्यानुसार अमेरिकेच्या अध्यक्षांना व्यक्तिगत वित्त विवरण देण्याची आवश्यकता नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली त्या २०१६ यावर्षी फेडरल इन्कम टॅक्स भरला तो अवघा ७५० डॉलर्स, असे वृत्त ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने रविवारी दिले.
या वृत्ताला गेल्या २० पेक्षा जास्त वर्षांतील कर भरणा केल्याच्या रिटर्न्सचा आधार घेण्यात आला आहे. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प अध्यक्ष म्हणून आले त्या त्यांच्या पहिल्या वर्षीही त्यांनी केवळ ७५० डॉलर्स आयकर म्हणून भरले आणि त्यांनी गेल्या १५ पैकी १० वर्षांत आयकरच भरला नाही आणि त्याचे कारण त्यांनी सांगितले की, त्यांना कमाई झाली त्यापेक्षा जास्त गमवावे लागले.