"रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध मी एका फोन कॉलने थांबवू शकतो," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 09:04 PM2024-07-20T21:04:38+5:302024-07-20T21:07:58+5:30
जगातील इतर देश पुन्हा एकदा अमेरिकेचा आदर करू लागतील, असाही व्यक्त केला विश्वास
Donald Trump, US Presidential Elections 2024: जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, पण आम्ही जगभरात शांतता, स्थैर्य आणि सलोखा नांदावी यासाठी प्रयत्न करत आहोत. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेले युद्ध मी एका फोन कॉलने थांबवू शकतो, असा दावा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले. "अमेरिकेत आमचे सरकार आल्यावर जगातील इतर देश पुन्हा एकदा आपला आदर करू लागतील. कोणताही देश आपल्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. आपल्या सीमा पूर्णपणे सुरक्षित राहतील," असेही ट्रम्प म्हणाले.
"सध्या सुरु असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय संकटांचा सामना जगाने याआधी क्वचितच केला असावा. युरोप, मध्य पूर्वमध्ये युद्ध पेटले आहे. तैवान, कोरिया, फिलीपिन्स आणि संपूर्ण आशियामध्ये संघर्षाचा धोका आहे. व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्यांदा निवडून आल्यास हे सर्व चित्र बदलण्याचा मी प्रयत्न करेन. मी रशिया आणि युक्रेनबरोबरच्या भयंकर युद्धांसह सध्याच्या प्रशासनाने निर्माण केलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय संकटाचा शेवट करेन. पण हे घडवून आणण्यासाठी आपण प्रथम आपल्या देशाला असक्षम नेतृत्वापासून वाचवलं पाहिजे,"
"जगातील प्रत्येक देशांना त्यांचे ओलिस ठेवलेले नागरिक सुखरूप परत हवे आहेत. मी पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांना परत पाठवावे, अन्यथा संघटनांना त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. इस्रायलच्या आयर्न डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीसारखा एक प्रकार अमेरिकेत तयार केला जाईल. त्यात ज्या त्रुटी आहेत त्यावरही काम केले जाईल," असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.