Donald Trump :डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सत्ता काबीज केली. त्यांच्या विजयात उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा वाटा आहे. विजयानंतर याचे फळही मस्क यांना मिळताना दिसत आहे. सरकारच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा प्रभाव जाणवतो. पण, यामुळेच आता कॅबिनेटमधील काही सदस्य त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. असे असूनही, डोनाल्ड ट्रम्प यांचा मस्क आणि त्यांच्या DOGE ला पूर्ण पाठिंबा आहे.
मंत्रिमंडळातील काही लोक नाराज बुधवारी ट्रम्प सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली, ज्यात ट्रम्प यांनी सरकारी खर्च आणि फेडरल कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केल्याबद्दल मस्क आणि DOGE टीमचे कौतुक केले. यावेळी त्यांनी काही कॅबिनेट सदस्य मस्क यांच्या कामाशी असहमत असल्याचे सांगितले अन् अशा सदस्यांना चेष्टेमध्ये का होईना, गंभीर इशाराही दिला.
सीएनएनच्या एका अहवालात म्हटले आहे की, मस्क केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देत असलेल्या सूचना कॅबिनेट सचिवांना त्रास देत आहेत. विशेष म्हणजे, इलॉन मस्क हे कॅबिनेट सदस्य नाहीत, तरीही ट्रम्प यांनी त्यांना बैठकीला संबोधित करण्याची परवानगी दिली. यादरम्यान, ट्रम्प यांनी गमतीत विचारले की, कुणी इलॉनवर नाराज आहे का? जर कुणी नाराज असेल, तर त्याला येथून हाकलून देऊ.
इलॉन मस्क यांची DOGE टीम काय करते?इलॉन मस्क DOGE, म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी विभागाचे प्रमख आहेत. ही एक सल्लागार संस्था आहे, जी ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानंतर अस्तित्वात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे आणि अनावश्यक सरकारी खर्चात कपात करणे, हे ट्रम्प यांच्या DOGE चे ध्येय आहे. मस्क यांनी दावा केला आहे की, DOGE ने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करुन अमेरिकन करदात्यांची सुमारे $65 अब्ज बचत केली आहे.
मस्क यांचा कर्मचाऱ्यांना ईमेलगेल्या आठवड्यात इलॉन मस्क यांनी सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला होता, ज्यात त्यांना त्यांच्या मागील कामाचा तपशील देण्यास सांगण्यात आले होते. मस्क यांनी ईमेलमध्ये म्हटले की, कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांत केलेल्या पाच गोष्टी सांगाव्यात, ज्यामध्ये ते सिद्ध करू शकतील की, त्यांना नोकरीवरून का काढू नये. यानंतर, त्यांनी सोशल मीडिया साइट X वर म्हटले की, जे लोक निर्धारित वेळेत ईमेलला प्रतिसाद देणार नाहीत, त्यांची नोकरी जाऊ शकते. पण, काश पटेल यांच्या नेतृत्वाखालील एफबीआयसह अनेक केंद्रीय एजन्सींनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मस्कच्या मेलकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले.