न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका पॉर्न स्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आहे. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असून आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात खटला चालणार आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प आता स्वतः कोर्टात आत्मसमर्पण करणार आहेत. यासाठी डोनाल्ड ट्रम्प सोमवारी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. अशा प्रकारचा आरोप झालेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
फ्लोरिडाहून अडीच तासांच्या विमान प्रवासानंतर डोनाल्ड ट्रम्प ला गार्डिया विमानतळावर उतरले. त्यानंतर ते न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरमध्ये गेले. मंगळवारी दुपारी ते मॅनहॅटन कोर्टहाऊसमध्ये जाणार आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे कोर्टात हजर होण्यापूर्वी आजूबाजूचा परिसर तसेच ट्रम्प टॉवरभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बॅरिकेड्ससोबतच ठिकठिकाणी काटेरी ताराही लावण्यात आल्या आहेत.
न्यूयॉर्कचे महापौर अॅडम्स यांनी असा इशारा दिला की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक महाभियोगादरम्यान हिंसकपणे निषेध करणाऱ्या कोणालाही अटक केली जाऊ शकते. दुसरीकडे, या सर्व प्रकरणांवर डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील जो टॅकोपिना म्हणाले की, हे सर्व हवेत आहे. डोनाल्ड ट्रम्प लढाईसाठी तयारी करत आहेत आणि ते स्वत:ची बाजू मांडणार आहेत.
काय आहे प्रकरण?डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलला तोंड बंद ठेवण्यासाठी दिलेल्या पैशांचं हे प्रकरण आहे. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. गेल्या आठवड्यात मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने आरोप लावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आता मॅनहॅटन कोर्टात हजर राहतील. मॅनहॅटन जिल्ह्याचे वकील अलविन ब्रॅग यांनी कोर्टात पुरावा सादर करताना निदर्शनास आणून दिले होते की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी स्टॉर्मी डॅनियलला १ लाख ३० हजार डॉलर एवढी रक्कम देण्यात आली. स्टॉर्मीचे खरे नाव स्टेफनी क्लिफॉर्ड आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करत असताना ही रक्कम देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.