वॉशिंग्टनः 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याचा दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या लष्कराने खात्मा केला. त्यानंतर आता त्याच्या उत्तराधिकाऱ्यालाही ठार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. अबू बक्र अल-बगदादीच्या नंबर एकच्या उत्तराधिकाऱ्यालाही अमेरिकेच्या लष्कराने ठार केले आहे. बहुधा त्याने अव्वल स्थान मिळवले असते. आता तो ठार झाला आहे, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी खात्मा करण्यात आलेल्या अबू बक्र अल-बगदादी याचा उत्तराधिकाऱ्याचे नाव जाहीर केले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, अबू बक्र अल-बगदादी याचा उत्तराधिकारी म्हणून अब्दुल्ला कर्दाश ऊर्फ हाजी अब्दुल्ला अल अफरी याचे नाव समोर आले होते. अब्दुल्ला कर्दाशला आयसिसमध्ये प्रोफेसर या नावाने सुद्धा ओळखले जाते. तसेच, असे सांगण्यात येते की, अब्दुल्ला कर्दाश हा आयसिसच्या सर्व कामांवर लक्ष ठेवून होता आणि त्याला काही खास निर्णय घेण्याचा अधिकारही होता.
दरम्यान, अबू बक्र अल-बगदादी याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने मोठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान अमेरिकेने भूसुरुंगात अबू बक्र अल-बगदादी याला ठार केले आहे. या वृत्ताला दुजोरा देत डोनाल्ड ट्रम्प म्हटले होते की, "काल रात्री अमेरिकेने जगातील पहिल्या क्रमांकाच्या दहशतवादी म्होरक्याला न्यायासमोर आणले. अबू बक्र अल-बगदादी ठार झाला आहे. जगातील सर्वात निर्दयी आणि हिंसक दहशतवादी संघटना असलेल्या आयसिसचा तो संस्थापक आणि म्होरक्या होता."
एप्रिलमध्ये आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. पाच वर्षात प्रथमच आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ जारी केला होता. मात्र तो व्हिडीओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. या व्हिडीओत त्यानं पूर्व सीरियातल्या आयसिसचा शेवटच्या बालेकिल्ला असलेल्या बागूजमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता.
बागूजमध्ये सुरू असलेला संघर्ष महिन्याभरापूर्वी संपला आहे. व्हिडीओत बगदादी तीन व्यक्तींना संबोधित करत होता. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांत श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाले. त्यात आयसिसचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर ५०० नागरिक गंभीर जखमी झाले. श्रीलंकेतल्या विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये चर्चना लक्ष्य करण्यात आले होते.