वॉशिंग्टन - अमेरिकेत तीन नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका पार पडल्या. यानंतर आता, ‘इलेक्टोरल कॉलेज’ने ज्यो बायडन यांना विजयी घोषित केल्यानंतरच, आपण व्हाईट हाऊस सोडू, असे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही दावा केला.
ट्रम्प ‘थँक्सगिव्हिंग डे’ निमित्त केलेल्या आपल्या भाषणात म्हणाले, बायडन यांना विजयी घोषित केले गेल्यास ‘इलेक्टोरल कॉलेज’ची मोठी चूक होईल. ट्रम्प यांना गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, की ‘इलेक्टोरल कॉलेज’ने बायडन यांना विजेता घोषित केल्यास आपण काय कराल? यावर उत्तर देताना ते म्हणाले, हे स्वीकार करणे अत्यंत कठीण असेल. व्हाईट हाऊस सोडण्यासंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, निश्चितपणे, मी व्हाईट हाऊस सोडेन आणि हे आपल्यालाही माहीत आहे. व्हाईट हाऊसमध्ये आपल्या अखेरच्या ‘थँक्सगिव्हिंग’ च्या योजनांसंदर्भात विचारले असता, ते म्हणाले, 'आपण सांगू शकत नाही, की काय आधी होईल आणि काय नाही.'
ट्रम्प म्हणाले, हा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला थँक्सगिव्हिंगदेखील असू शकतो. यावेळी त्यांनी जॉर्जिया येथे दोन सीनेट सीटसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी रॅली करणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, जॉर्जियामध्ये रिपब्लिकन उमेदवार सीनेटर डेव्हिड पेर्ड्यू आणि सीनेटर केली लोफ्ल यांच्यासाठी आपल्या हजारो समर्थकांनिशी शनिवारी रॅली करू.
येथे पाच जानेवारीला पोट निवडणूक होणार आहे. यानंतरच जॉर्जिया कोणत्या पक्षाच्या बाजुला जाते हे स्पष्ट होईल. तत्पूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बायडन यांनी विजय मिळवला आहे. मात्र, ट्रम्प यांनीही अद्याप आपला पराभव स्वीकारलेला नाही. एवढेच नाही, तर निवडणूक निकालाविरोधत त्यांनी अनेक खटलेही दाखल केले आहेत.