वॉशिंग्टन : एकिकडे कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असताना दुसरीकडे भारताच्या लडाख सीमेवर चीनने कुरघोड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. हा तणाव मिटवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात बोललो आहे, परंतु चीनशी झालेल्या वादामुळे ते चांगल्या मूडमध्ये नाहीत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात पुन्हा एकदा बोलणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "भारत आणि चीन यांच्यात मोठा संघर्ष सुरु आहे. १.४ बिलियन लोकसंख्या असलेले दोन्ही देश, ज्यांच्याकडे लष्कराची ताकद मजबूत आहे. भारत आनंदी नाही आणि कदाचित चीनही खूश नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. मात्र, चीनसोबत सध्या सुरु असलेल्या वादामुळे ते चांगल्या मूडमध्ये नाही आहेत."
गुरुवारी व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारत आणि चीनमधील हा एक मोठा संघर्ष सुरु आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी खूप पसंत करतो. ते अतिशय सभ्य आहेत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
दरम्यान, भारत आणि चीनमधील हा तणाव मिटविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रस्तावरून भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी आम्ही चीनच्या संपर्कात आहोत. आम्हाला कोणत्याही तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे उत्तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला दिले आहे.
चीनसोबत निर्माण झालेल्या सीमा वादावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भाष्य केले. 'आपले जवान अतिशय जबाबदारीने सीमावर्ती भागातील परिस्थिती हाताळत आहेत. दोन्ही देशांनी मिळून तयार केलेल्या प्रोटोकॉलचं सैन्याकडून पालन केले जात आहे. नेतृत्त्वाकडून देण्यात आलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी जवान करत आहेत. देशाचे अखंडत्व आणि सार्वभौमत्व राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,' असे अनुराग श्रीवास्तव म्हणाले.
याचबरोबर, अनुराग श्रीवास्तव यांनी नेपाळ आणि चीन यांच्यासोबत सध्या सुरू असलेल्या सीमा वादाबद्दल सरकारची भूमिका मांडली. 'भारत आणि नेपाळचे संबंध अतिशय जुने आहेत. कोरोना संकटाच्या काळात आपण कोणत्याही परवान्याशिवाय व्यापार करत आहोत. सध्या नेपाळसोबत निर्माण झालेल्या वादावर आमचे लक्ष आहे. भारत संवेदनशीलपणे आपल्या शेजाऱ्यांसोबतचे संबंध कायम ठेवेल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.