डेमोक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या पराभवाने तब्बल 128 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. मात्र ट्रम्प अद्याप आपला पराभव स्वीकारण्यास तयार नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं आहे. यामध्ये त्यांनी कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी "पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सर्व अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार" अशी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी भाषणादरम्यान औषध कंपनी Pfizer च्या कोरोना लसीबद्दल नवीन माहिती दिली. निवडणुकीच्या निकालांतर ट्रम्प यांचं हे पहिलंच सार्वजनिक भाषण आहे. यामध्ये त्यांनी 2021 च्या एप्रिल महिन्यापर्यंत अमेरिकेच्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध होईल अशी अशा व्यक्त केली आहे. "काही आठवड्यांमध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक आणि कोरोनाचा जास्त धोका असलेल्या नागरिकांना लस दिली जाईल. आमच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला Pfizer ची लस मोफत देण्यात येणार आहे" असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेसारखा मोठा देशही व्हायरसपुढे हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. याच दरम्यान अमेरिकेचे आरोग्य मंत्री एलेक्स अजार यांनी कोरोना लसीसंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. अमेरिकेत डिसेंबर महिन्यात कोरोना लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
लढ्याला यश! डिसेंबरमध्ये उपलब्ध होणार Corona Vaccine, आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती
फायजरने विकसित केलेल्या लसीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आणि सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. फायजर कंपनी आपल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष आरोग्य प्राधिकरणाला लवकरात लवकर सोपवू शकतात. अमेरिकेत सरकार लस देण्याच्या मोहिमेची तयारी करत असल्याची माहिती एलेक्स अजार यांनी दिली आहे.
कोरोना लसीसंदर्भात 1.95 अब्ज डॉलरचा करार
"सरकारला दर महिन्याला फायजरने विकसित केलेल्या लसीचे जवळपास दोन कोटी डोस उपलब्ध होतील. अमेरिकन सरकार आणि फायजर यांच्यात कोरोना लसीसंदर्भात 1.95 अब्ज डॉलरचा करार झाला असून 50 मिलियन नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार आहे. लसीबाबतचा अंतिम निर्णय हा चाचणीचा रिझल्ट कसा आहे यावर असणार आहे. तसेच सर्वात पहिला डोस हा नर्सिंग होममधील वृद्धांना देण्यात येणार आहे" असं देखील अजार यांनी म्हटलं आहे.