न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कारासंदर्भात आपली नाराजी व्यक्त केली आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळणे हा आपल्यावर झालेला अन्याय असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सोमवारी (23 सप्टेंबर) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत द्वीपक्षीय बैठक झाली. त्यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही खंत व्यक्त केली आहे.
'निष्पक्षपणे नोबेल पुरस्कार दिला असता तर आज मला अनेक गोष्टींसाठी तो पुरस्कार मिळाला असता. मात्र त्यांनी असं केलं नाही. बराक ओबामा यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार आपल्याला कशासाठी देण्यात आला हे त्यांना देखील माहीत नव्हते. तुम्हाला माहिती आहे का? ओबामांच्या केवळ याच गोष्टीशी मी सहमत आहे' अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 2009 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मुत्सदेगिरी आणि जगभरातील लोकांमध्ये सहकार्याची भावना अधिक सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळणे हा आपल्यावर झालेला अन्याय असल्याचं म्हणत त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. भारत, पाकिस्तान राजी असल्यास मी काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करेन, असं ट्रम्प म्हणाले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या महासभेसाठी अमेरिकेत आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत आणि पाकिस्ताननं काश्मीर प्रश्नावर तोडगा काढावा. दोन्ही देशांसाठी फायदेशीर असेल असा मार्ग काढून काश्मीर प्रश्न सोडवण्यात यावा, असं ट्रम्प म्हणाले. प्रत्येक समस्या सोडवली जाऊ शकते. समस्येतून मार्ग निघू शकतो असं म्हणत ट्रम्प यांनी भारत, पाकिस्तान काश्मीर प्रश्न सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.