वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची (social media platform) सुरूवात केली आहे. याच्या सुरुवातीलाच त्यांनी, अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन (Joe Biden) यांच्यावरच निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ट्विटरवर तालिबानची सक्रियता स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, तरीही तुमचे आवडते राष्ट्रपती जो बायडेन यासंदर्भात गप्प आहेत. महत्वाचे म्हणजे, ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट बंद केले होते. (Donald Trump own social media platform called 'TRUTH Social)
गेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांनी माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता. ट्रम्प हे अमेरिकेचे असे एकमेवर राष्ट्रपती राहिले आहेत, ज्यांना तब्बल दोन वेळा महाभियोगाला सामोरे जावे लागले. मात्र, ते यातून सही सलामत बाहेरही आले. ते पुढच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही पुन्हा बायडेन यांच्याविरोधात लढण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊनच त्यांनी स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केला असल्याचे बोलले जात आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव 'ट्रुथ सोशल' ठेवण्यात आले आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातच, अमेरिका आणि तालिबान यांच्यात करार झाला होता. ट्रम्प यांनी तालिबानशी केलेल्या करारात आपले सैन्य मागे घेण्याची संपूर्ण व्यवस्था केली होती. यासाठी ट्रम्प यांनी 1 मे तारीख निश्चित केली आहे. मात्र नंतर, बायडेन यांनी ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. दरम्यान तालिबानने 1 ऑगस्टला काबूलवर कब्जा केला होता आणि 1 महिन्यानंतर तालिबानने येथे आपल्या सरकारची स्थापना केली होती.