वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव आता काही प्रमाणात निवळला असल्याचं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांची लवकरच भेट घेणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. 'भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटणार असून, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने खूप प्रगती झाली आहे' असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. मात्र या संबोधनापूर्वी मोदी टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, या कार्यक्रमात मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित 50 हजारहून अधिक लोकांना संबोधित करणार आहेत.
संयुक्त राष्ट्रांची आमसभा न्यूयॉर्कमध्ये या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता आहे. 'हाऊदी मोदी' कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ट्रम्प ओहियोचा दौरा करतील. ह्युस्टनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध, व्यापार, संस्कृती यावर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प यांच्यासोबत अनेक मोठ्या व्यक्तीही सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच जगातील दोन देशांचे प्रमुख एकाच मंचावरून हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
'काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे हे सर्वांना माहीत आहे. परंतु दोन आठवड्यांपूर्वी जेवढा तणाव या दोन्ही देशांमध्ये होता तो आता कमी झाला आहे' असं डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी म्हटलं होतं. सोमवारी (9 सप्टेंबर) ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी 'दोन्ही देशांची साथ हवी आहे. जर दोन्ही देशांची इच्छा असेल तर आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत' असं म्हटलं होतं. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला आहे.