Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यामुळे जगभरातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. यामध्ये 27 देशांच्या युरोपियन युनियनचाही समावेश आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या युरोपियन युनियनला ट्रम्प प्रशासन आल्यामुळे आणखी आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. याचे कारण म्हणजे, ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान वारंवार आयात शुल्क वाढवण्याची विधाने केली आहेत. याशिवाय रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठीही तो पुढाकार घेऊ शकतात.
झेलेन्स्की बैठकीला उपस्थित राहणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर संबंधांवर होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांच्यासह सुमारे 50 युरोपीय नेते शुक्रवारी बुडापेस्टमध्ये भेटणार आहेत.
दोन घटनांमुळे चिंता वाढली आहेपोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क म्हणाले की, अमेरिकन निवडणुका आणि जर्मनीतील राजकीय पेच, या दोन घटनांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. मात्र, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रभाव अद्याप जाणवलेला नाही. युरोपियन कौन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिशेल म्हणाले की, अमेरिकेसोबतचे आमचे संबंध महत्त्वाचे आहेत आणि आम्ही ते अधिक दृढ करण्यासाठी तयार आहोत.
यापूर्वीच्या ट्रम्प सरकारने शुल्क आकारले पूर्वीच्या ट्रम्प प्रशासनाने 2018 मध्ये EU स्टील आणि ॲल्युमिनियमवर विदेशी उत्पादनांमुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याच्या दाव्याच्या आधारे शुल्क लागू केले होते. तर, युरोपियन आणि इतर मित्र राष्ट्रांनी इतर वस्तूंसह अमेरिकन-निर्मित मोटारसायकल, बोर्बन व्हिस्की, पीनट बटर आणि जीन्सवर शुल्क लादून बदला घेतला होता. युक्रेन आणि पश्चिम आशियातील युद्धे, तसेच स्थलांतर आणि हवामान बदलांसारख्या समस्यांसह यूएस निवडणुकीच्या निकालाचा परिणाम युरोपमध्ये पुढील काही वर्षांमध्ये जाणवू शकतो.