Donald Trump : वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शपथविधीपूर्वी मोठा धक्का बसणार आहे. एडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प राहण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी (हश मनी प्रकरण) डोनाल्ड ट्रम्प यांना १० जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दरम्यान, हश मनी प्रकरणातील हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या तारखेच्या १० दिवस आधी येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे २० जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.
या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा सुनावली जाईल, असे शुक्रवारी न्यायाधीश जुआन मर्चन यांनी सांगितले. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांना तुरुंगवास होणार नाही, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिक्षेबाबत बोलताना न्यायाधीश जुआन मर्चन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, डोनाल्ड ट्रम्प यांना 'कंडीशनल डिस्चार्ज' दिला जाणार आहे. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणार नाही, असे समजते. तसेच, डोनाल्ड ट्रम्प हे सुनावणीसाठी प्रत्यक्षरित्या किंवा व्हर्च्युअल उपस्थित राहू शकतात, असेही न्यायाधीश जुआन मर्चन यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
गेल्या मे महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांना ३४ आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. हे आरोप २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत एडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प राहण्यासाठी गुपचूप पैसे दिल्यासंबंधी होते. हे पैसे देण्याचा उद्देश एडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अफेअर असल्याचा आरोप दाबून टाकण्याचा होता.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे होते की, त्यांनी आपले लग्न वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले आणि त्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. दरम्यान, एडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियल्स आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधांची २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बरीच चर्चा झाली होती.