वॉशिंग्टन : रिपब्लिकन पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अस्थिर असून, सूडभावनेने वेडे झाले आहेत, अशा शब्दांत डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला; तर, अमेरिकन नागरिकांना त्यांच्या विभाजनाच्या राजकारणाचा विरोध करण्याचे आवाहन केले. देशबांधवांना भावनिक साद घालताना हॅरिस यांनी आपल्या शेवटच्या मुख्य भाषणात त्यांनी स्वत:ला एक लढाऊ नेत्या असल्याचे सांगितले.
त्या म्हणाल्या की, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सैन्याचा वापर केवळ त्यांच्याशी असहमत असलेल्या अमेरिकन नागरिकांविरुद्ध करू इच्छित आहेत. अशी व्यक्ती अध्यक्षपदाची उमेदवार असू शकत नाही. हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे, जे अस्थिर आहे, प्रतिशोधाने पछाडलेले आहे आणि असीम सत्ता मिळविण्यासाठी आक्रमक आहे. ५ नोव्हेंबरच्या निवडणुकीत ६० वर्षीय हॅरिस व ७८ वर्षीय ट्रम्प यांच्यात सामना होणार आहे.
ट्रम्प समर्थकांना बायडेन म्हणाले, कचरा अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांची तुलना कचऱ्याशी केली. काही दिवसांपूर्वी एका हास्य कलाकाराने केलेल्या टिप्पणीबद्दल ते बोलत होते.या कलाकाराने ट्रम्प यांच्या रॅलीमध्ये प्यूर्टो रिकोची तुलना कचऱ्याच्या बेटाशी केली होती. लॅटिनोत एका प्रचार कार्यक्रमादरम्यान बायडेन म्हणाले की, मला आजूबाजूला जो कचरा तरंगताना दिसत आहे. ते त्यांचे समर्थक आहेत. दरम्यान, या टिप्पणीचा डाेनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला आहे.
भारतीय-अमेरिकन वंशाच्या नागरिकांचे हॅरिस यांना समर्थन अटलांटा : डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना बहुतेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाकडून वाढता पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय-अमेरिकन असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. वासुदेव पटेल म्हणाले, भारतीय वंशाच्या नेत्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. दिल्लीचे मूळ रहिवासी असलेले सौरभ गुप्ता म्हणाले की, मी गेल्या वेळी ट्रम्प यांना मतदान केले. पण, यावेळी मी कमला हॅरिस यांचे समर्थन करत आहे.