वॉश्गिंटन - अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. त्यात रिपल्बिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटीक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांच्यात खुल्या चर्चेवेळी खडाजंगी झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जबरदस्त प्रहार केले. हॅरिस जिंकल्या तर पुन्हा इस्त्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो असं ट्रम्प म्हणाले त्याशिवाय रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर कमला हॅरिस यांनी व्लादिमीर पुतिन तुम्हाला खाऊन टाकतील असा पलटवार केला.
या चर्चेदरम्यान एक रंजक किस्साही घडला. ८ वर्षात पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस एकमेकांसमोर उभे ठाकले, वार-पलटवार केले आणि हस्तांदोलनही केले. या चर्चेत गाझाच्या युद्धाचा मुद्दाही समोर आला. त्यावर कमला हॅरिस यांनी सांगितले की, मी तर टू स्टेट सॉल्यूशनवर भर देते त्यावर ट्रम्प यांनी म्हटलं की, जर मी राष्ट्रपती असतो तर त्याठिकाणी इथपर्यंत समस्या पोहचली नसती. कमला हॅरिस यांचा इस्त्रायलवर द्वेष आहे. त्या भागाशी त्यांना चीड आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला. तर ट्रम्प यांचा दावा चुकीचा आहे मी इस्त्रायलसोबत आहे. जर ट्रम्प राष्ट्रपती असते तर आतापर्यंत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन किव्हमध्ये असते असं प्रत्युत्तर हॅरिस यांनी दिले.
व्लादिमीर पुतिन यांच्या दबावात तुम्ही शस्त्रे खाली टाकली असती. व्लादिमीर पुतिन किव्हमध्ये बसले होते त्यांची नजर युरोपवर होती. ती सुरुवात पोलंडपासून केली असती. एका हुकुमशाहासोबत मैत्रीचा परिणाम तुम्ही जाणता का? ते तर तुम्हाला लंचमध्ये खाऊन टाकतील असं कमला हॅरिस यांनी सांगितले. चर्चेत रशिया आणि यूक्रेन यु्द्धात तुम्हाला यूक्रेनचा विजय हवा का असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर कुठलेही थेट उत्तर न देता ट्रम्प यांनी प्रश्न टाळला. परंतु आम्ही युद्ध रोखलं असते, युद्ध थांबणेच अमेरिकेच्या हिताचे असते असं मला वाटतं हे उत्तर ट्रम्प यांनी दिले.
इतकेच नाही तर या चर्चेवेळी बायडन सरकारच्या अपयशाचे पाढे डोनाल्ड ट्रम्प यांनी वाचून दाखवले. त्यावर तुम्ही बायडन यांच्याविरोधात निवडणूक लढत नाही असं कमला हॅरिस यांनी म्हटलं. तर तुम्ही कमला हॅरिस यांच्यावर वर्णभेदाची टिप्पणी का करता असा प्रश्न विचारला तेव्हा हॅरिस कोण आहेत याचं मला काही देणंघेणं नाही. मी कुठेतरी वाचलं होतं त्या ब्लॅक नाहीत असं ट्रम्प यांनी सांगितले.