वॉशिंग्टन- नॉर्थ कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांना वादग्रस्त अणूकार्यक्रमावर चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे.
गेल्या वर्षभरामध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप तसेच त्यातून तयार झालेली युद्धजन्य स्थिती पाहाता अशी चर्चेची कोणतीही शक्यता दिसत नव्हती. पण अचानक दोन्ही नेत्यांनी हा चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. किम जोंग उन यांचे आमंत्रण स्वीकारल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे. तसेच पुढील दोन महिन्यांमध्ये ट्रम्प किम यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दोन्ही राष्ट्रप्रमुखांची भेट व्हावी यासाठी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांनी प्रयत्न केल्याचे मानले जाते. या भेटीच्या शक्यतेचे वर्णन त्यांनी ऐतिहासिक मैलाचा दगड असे केले आहे. यामुळे कोरियामध्ये शांतता निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. १९९४ आणि २००२ साली उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा झाली होती मात्र त्यातून कोणताही ठोस कार्यक्रम जाहीर झाला नाही.