वाॅशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जाे बायडेन यांची निवड जाहीर होऊनही मावळते राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प हे सत्ता हस्तांतरासाठी तयार नाहीत. स्वत:ला त्यांनी व्हाईट हाउसमध्ये काेंडून घेतले आहे. एवढेच नव्हे तर आपणच विजयी झाल्याचे ते सातत्याने भासवित असून ट्रम्प प्रशासानाकडून बायडेन यांच्या प्रतिनीधींची सतत अडवणूक करण्यात येत आहे. अलीकडेच डाेनाल्ड ट्रम्प यांनी, ‘आम्हीच जिंकू ’, असे ट्वीट केले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी ३ नाेव्हेंबरला निवडणूक झाली. त्यात झालेला पराभव ट्रम्प स्वीकारण्यास तयार नाहीत. लहरीपणा दाखवून देत आहेत. निवडणुकीनंतर ट्रम्प यांनी फार कमी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. तसेच आठवड्याच्या शेवटी दाेन वेळा ते व्हाईट हाउसमध्येच गाेल्फ खेळले आहे. राष्ट्राध्यक्षांसाेबत हाेणाऱ्या गाेपनीय बैठकाही घेणे बंद झाले आहे. सततच्या पत्रकार परिषदाही जवळपास बंद झाल्या आहेत. याऐवजी ट्रम्प हे ट्विटरवरच जास्त सक्रीय झालेले दिसत आहेत.
चार वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी विजय मिळविल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरुन व्हाईट हाउसचा फेरफटका मारला हाेता. सत्तेचे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सहज व्हावी, यासाठी नियाेजित अध्यक्षांना आमंत्रण देण्याची परंपरा राहिली आहे. परंतु, ट्रम्प यांनी अद्याप बायडेन यांना आमंत्रित केले नाही. एकूण ट्रम्प यांच्याकडून असहकाराची भूमिका घेण्यात आलेली आहे. दुसरीकडे, ट्रम्प प्रशासनातील इतर मंत्रीही पुन्हा सत्ता स्थापनेचे दावे करित आहेत. परराष्ट्रमंत्री माईक पाॅम्पीओ यांनीही पुन्हा ट्रम्प यांचेच सरकार स्थापन हाेणार असल्याचा दावा केला आहे.
ट्रम्प यांच्याकडून पराभवचा अस्वीकार हे लाजीरवाणे : बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी पराभव न स्वीकारणे हे लाजीरवाणे असल्याचे सांगून हा मुद्दा तेवढा महत्त्वाचा नाही, असे नियाेजित अध्यक्ष जाे बायडेन यांनी स्पष्ट केले. डाेनाल्ड ट्रम्प निकालांविराेधात त्यांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. तर, बहुमताचा स्पष्ट काैल बायडेन यांना मिळालेला आहे. याबाबत बायडेन यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, हे लाजीरवाणे आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या नावलाैकीकास हे शाेभा देणारे कृत्य नाही. बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे दुर्लक्ष केले असून आमच्या याेजनांसाठी महत्त्वाचे नाही, असे स्पष्ट केले.
फेरमतमाेजणीचा फायदा किती ?
ट्रम्प यांनी फेरमतमाेजणीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयीन लढ्यातून जाे बायडेन यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात ते यशस्वी हाेतील असा त्यांना विश्वास आहे. इतिहास त्यांच्या विराेधात आहे. आतपर्यंत एकदाही न्यायालयीन लढ्यातून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल बदललेले नाहीत.