अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला जाहीरपणे इशारावजा धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काही अमेरिकन प्रॉडक्ट विशेषकरून हर्ले-डेव्हिसन दुचाकीवर भारतामध्ये आकारण्यात येत असलेल्या अतिरिक्त कराचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर तेवढाच कर आकारण्याची धकमी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताचा उल्लेख कर आकारणारा महाराजा असा केला होता. मे २०१९ मध्ये अमेरिकेने भारताला अमेरिकी बाजारांमध्ये प्राधान्य देणाऱ्या सामान्यीकृच प्रणाली (GSP) ला समाप्त केले होते.
ट्रम्प यांनी आरोप केला होता की, भारताने अमेरिकेला आपल्या बाजारात योग्य पद्धतीने पोहोच दिलेली नाही. फॉक्स बिझनेस न्यूजचे लेरी कुडलो यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी भारतातील कराचे दर हे खूपच जास्त असल्याचे सांगत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, मी दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो ती आहे युनिफॉर्म टॅक्स, भारत अतिरिक्त कर आकारतो. मी हर्ले डेव्हिसनबाबत मी असं पाहिलं आहे. मी त्यांना विचारलंही होतं की, तुम्ही भारतासारख्या ठिकाणी कसे आहात? तिथे तर १०० टक्के, १५० टक्के आणि २०० टक्के आकारला आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, मी केवळ एवढंचं सांगू इच्छितो की, जर भारत आमच्यावर कर लावत असेल तर आम्हीही त्यांच्यावर कर आकारला पाहिजे. त्यांनी भारतासोबत ब्राझीलच्या कर प्रणालीवर प्रश्नही उपस्थित केले आहेत. ट्र्म्प यांनी २०२४ मध्ये होणारी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी रिपब्लिकन पार्टीकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांसाठी बुधवारी आयोजित केलेल्या पहिल्या प्राथमिक चर्चेचमध्ये सहभाग घेण्यास नकार दिला होता.