नवी दिल्ली - ओमायक्रॉन विषाणूचा जगभरात झपाट्याने प्रसार होत आहे. नेदरलँडमध्ये या विषाणूने बाधित झालेले १३ रुग्ण आढळले, तर जर्मनी, इटलीमध्येही ओमायक्रॉनचे अस्तित्व आढळले आहे. त्यामुळे जग धास्तावले असून, आफ्रिकेतील प्रवाशांवर बंदी घालणाऱ्या देशांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत नऊ देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. भारतानेही खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिलासादायक मत व्यक्त केलं आहे.
ओमायक्रॉन विषाणू हा काळजी करण्याचं कारण असायला हवं, घाबरण्याचं नसू नये, असे बायडन यांनी म्हटलं आहे. तसेच, नागरिकांनी लसीकरणावर जोर द्यावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. अमेरिका आरोग्य विभागाचे अधिकारी ओमायक्रॉनच्या म्युटेशनसंदर्भात लस बनविणाऱ्या कंपन्यांसोबत सातत्याने चर्चा करत आहेत. त्यामुळेच, लॉकडाऊनशिवाय आणि येथील उत्सवांवर बंदी न लावताच ओमायक्रॉनवर नियंत्रण ठेवण्यास अमेरिका सक्षम असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेने सद्यस्थितीत 8 आफ्रिकी देशांतील हवाई वाहतुकीवर काही निर्बंध लादले आहेत.
कोरोनाची लस घेतली नसल्यास आपण लस घ्यायला प्राधान्य द्यावे. जर लस घेतली असेल तर लसीचा बुस्टर डोस घ्यावा, असे जो बायडन यांनी म्हटलं आहे. अमेरिका आरोग्य विभागाचे प्रमुख सल्लागार डॉक्टर अँथनी फाऊची यांचा हवाला देत बायडन म्हणाले की, सध्याची कोरोनावरील लस ओमायक्रॉन वेरियंटवरही कार्यरत राहील. त्यात, बुस्टर डोस घेतल्यास अधिक सुरक्षीत होईल.
ओमायक्रॉनची लक्षणे मध्यम स्वरूपाची
ओमायक्रॉनमुळे मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाची बाधा होईल, असे मत साऊथ आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. अँगेलिक्यू कोएत्झी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ओमायक्रॉनच्या बाधेमुळे रुग्णाचे स्नायू एक-दोन दिवस दुखतील व त्याला थकवा जाणवेल. थोडासा कफ होईल. मात्र, त्यांच्या तोंडाची चव जाणे किंवा वास न येणे, या समस्या त्यांना नसतील.