कोलंबो : माहुतांनी दारू पिऊन हत्तींवरून स्वारी करू नये असा आदेश श्रीलंका सरकारने दिला. हत्तींसह सर्वच प्राण्यांच्या संरक्षणासाठी नवा कायदा केला आहे. श्रीलंकेत पाळीव हत्तींचे हाल होत असल्याच्या घटना उजेडात आल्या होत्या. ते रोखण्यासाठी सरकार आता सक्रिय झाले आहे.इथे अनेक श्रीमंत व्यक्ती आपल्या वैभवाचे दर्शन घडविण्यासाठी हत्ती पाळतात. मात्र त्या हत्तींना क्रूर वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी वन्यजीवप्रेमींनी सरकारकडे केल्या होत्या. त्या त्रासापासून हत्ती व इतर प्राण्यांची सुटका व्हावी यासाठी नवा कायदा केला. या पाळीव हत्तींना रोज दोन ते अडीच तासात पाण्यात मस्त डुंबू द्यावे, त्यांना दररोज पाच किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतर फिरवून आणावे असा नियमही नव्या कायद्यात आहे. श्रीलंकेमध्ये सुमारे ७५०० हत्ती असून त्यातील ३०० ते ४०० हत्ती विविध लोकांनी पाळले आहेत. पाळीव हत्तींना सरकारने चक्क फोटो ओळखपत्रे दिली असून, त्यात त्यांच्या डीएनएचीही सविस्तर माहिती आहे. पाळीव हत्तीणीपासून तिच्या पिल्लाला वेगळे काढता येणार नाही. पिल्लाच्या संगोपनाकडे त्यांच्या मालकाने बारीक लक्ष दिले पाहिजे असा आदेश श्रीलंका सरकारने दिला आहे.पर्यटकांना हत्तीवरून फेरफटका मारण्याचे विलक्षण आकर्षण असते. मात्र लंकेत हत्तीच्या पाठीवर चारपेक्षा जास्त पर्यटकांना बसविण्यास बंदी आहे. हत्तींचा चित्रपटाच्या चित्रीकरणात वापर करता येणार नाही. मात्र सरकारचा एखादा प्रकल्प असेल तर त्यासाठी पशुवैद्यक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हत्तींचा चित्रीकरणात वापर केला जाईल असे श्रीलंका सरकारने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)कायदा मोडणाऱ्याला तीन वर्षांचा कारावास श्रीलंका सरकारने म्हटले आहे की, पाळीव हत्तींची दर सहा महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करावी. जो या कायद्याचा भंग करेल, त्याच्याकडील हत्ती सरकार ताब्यात घेईल. हत्तीच्या मालकाला कायदा धाब्यावर बसविल्याबद्दल तीन वर्षांचा कारावासही होऊ शकतो.
Sri Lanka: दारू पिऊन हत्ती ‘चालवू’ नका! माहुतांना श्रीलंका सरकारचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 7:14 AM