आगीसोबत खेळू नका, अन्यथा तिसरं महायुद्ध भडकेल...! रशियाची अमेरिकेला धमकी, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 06:09 PM2024-08-29T18:09:11+5:302024-08-29T18:10:09+5:30
"जर पाश्चात्य देशांनी युक्रेनला रशियात हल्ले करण्यासाठी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली, तर संकटांचा डोंगर कोसळू शकतो आणि जग तिसऱ्या महायुद्धाकडेही जाऊ शकते"
रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे नाव नाही. संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे. यातच आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. जर पाश्चात्य देशांनी युक्रेनला रशियात हल्ले करण्यासाठी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली, तर संकटांचा डोंगर कोसळू शकतो आणि जग तिसऱ्या महायुद्धाकडेही जाऊ शकते
मॉस्कोमध्ये पत्रकारांसोबत बोलताना लावरोव्ह म्हणाले, जर पाश्चात्य देशांनी युक्रेनला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा रशियावर हल्ला करण्यासाठी परवानगी दिली, तर ते आगीशी खेळल्यासारखे होईल. याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात.
याच बरोबर, लावरोव्ह यांनी अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशांना युक्रेनची विनंती नाकारण्यास सांगितले आहे, ज्यात युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि इंग्लंडकडे, पाश्चिमात्य देशांनी पुरवलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा रशियाविरोधात वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. मात्र, युक्रेनने वारंवार विनंती करूनही अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम आहे की, लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर केवळ युक्रेनच्या भूमीवरच करावा. रशियाच्या भौगोलिक सीमेत करू नये.
पाश्चात्य देशांनी युक्रेनची विनंती मान्य केल्यास युक्रेन-रशिया युद्ध वेगळ्या वळणावर जाईल, असा इशारा लावरोव्ह यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आहे. ते म्हणाले, “आम्ही केवळ स्टॉर्म शॅडोच नाही तर, लांब पल्ल्यांचे मिसाइल वापरण्यासंदर्भात अमेरिकेकडून परवानगी देण्यासंदर्भात ऐकत आहोत. वाशिंग्टनमधील काही अज्ञात सूत्रांनी म्हटले आहे की, युक्रेनच्या विनंतीकडे सकारात्मक दृष्टीने बघितले जात आहे. अमेरिकेकडून ही ब्लॅकमेलिंग आहे. पाश्चिमात्य देश परिस्थिती आणखी बिघडण्यापासून वाचवू इच्छित आहे, असे जगाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. मात्र वास्तवात, हा एक धोका आहे. खरे तर, पाश्चिमात्य देश परिस्थिती आणखी खराब होण्यापासून वाचवत नाहीयेत, तर बिघडवण्यासाठी युक्रेनला चिथावणी देत आहेत."