लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विविध प्रकारच्या संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा सध्या मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यातून मानवासाठी अनेक महत्त्वाचे शोध वा फायदे समोरही येत आहेत. टेक्सास विद्यापीठाकडून सात महिन्यांपासून सुरू असलेल्या एका संशोधनानंतर, एआयच्या मदतीने भूकंपाची पूर्वसूचना एक आठवड्यापूर्वीच मिळणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यंत्रणेची अचूकता सुमारे ७० टक्के असल्याचे या प्रकल्पातील संशोधकांचे म्हणणे आहे.
कसे झाले संशोधन? ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठाने विकसित केलेल्या एआय मॉडेलकडून चीनमध्ये मागील सात महिने प्रयोग सुरू होता. रिअल टाइम प्रणालीमध्ये भूगर्भातील हालचालींची माहिती गोळा करण्यात आली. शिवाय यापूर्वी आलेल्या भूकंपाची माहितीही या मॉडेलला देण्यात आली. सर्व माहितीचे विश्लेषण करून चीनमध्ये ७ महिन्यांमध्ये आलेल्या छोट्या-मोठ्या भूकंपांपैकी ७० टक्के भूकंपाचा आठवडाभरापूर्वी इशारा दिला.
३०० किमी क्षेत्रात इशाराएआय मॉडेलने सुमारे ३०० किमी परिसरातील १४ भूकंपांची अचूक पूर्वकल्पना दिली. विशेष म्हणजे भूकंप किती रिश्टर स्केलचा येईल, हेही सांगण्यात आले. काही भूकंपाचा अंदाज चुकलाही. परंतु, अधिक संशोधन आणि प्रयोगानंतर त्याची अचूकता वाढवता येईल, असे संशोधकांनी सांगितले.
एआयमुळे वाढली विजेची मागणीnजगभरात एआयआधारित मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहेत. त्यासाठी विजेची मागणीही अधिक वाढली आहे. ही मागणी २०२७ पर्यंत नेदरलँड, अर्जेंटिना आणि स्वीडनसारख्या देशांच्या वार्षिक विजेच्या मागणीपेक्षाही अधिक असेल, nअसा अंदाज ॲमस्टरडॅम येथील विद्यापीठाच्या संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. डेटा फिडिंग, डेटा प्रोसेसिंग तसेच डेटा स्टोरेजसाठी अधिक वीज लागत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.