वॉशिंग्टन : सूर्याला जोरदार धडक देण्याच्या दिशेने निघालेल्या एका ग्रहाचा अमेरिकी खगोलशास्त्रज्ञांनी शोध लावला आहे. केप्लर १६५८-बी असे या ग्रहाचे नाव असून, त्याच्या हालचालींचे निरीक्षण केले जात आहे. सूर्य असो वा पृथ्वी त्यांचा भविष्यकाळात कशाप्रकारे विनाश होईल याची उत्तरे या ग्रहाच्या अभ्यासातून मिळण्याची शक्यता आहे.
आपल्या सौरमालेच्या बाहेर असलेला केप्लर १६५८-बी हा ग्रह पृथ्वीपासून २६०० प्रकाशवर्षे इतक्या दूर अंतरावर आहे. त्याला तप्त गुरू ग्रह असेही संबोधले जाते. गुरू ग्रहाइतका आकार असलेल्या केप्लर १६५-बी ग्रह बुध व सूर्य यांच्यामधील कक्षेतून सूर्याभोवती परिभ्रमण करतो. या ग्रहावर अतिशय तप्त वातावरण असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
भ्रमणाचा कालावधी होतोय कमी
दी ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात म्हटले आहे की, सूर्याभोवती केप्लर १६५८-बी या ग्रहाला भ्रमण करण्यास तीन दिवसांपेक्षा कमी कालावधी लागतो. तो कालावधी दरवर्षी १३१ मिलिसेकंदाने कमी होत आहे. या ग्रहाचा शोध खगोलशास्त्रातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
ब्रह्मांडाच्या निर्मितीचाही अभ्यास!
आपल्या ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या वेळेस तयार झालेल्या एका आकाशगंगेचा चिली देशातील ॲटाकामा मिलिमीटर ॲरे (आल्मा) या दुर्बिणीच्या साहाय्याने शोध लावण्यात आला होता. सुमारे दीडशे कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या या आकाशगंगेला वुल्फ डिस्क असे नाव देण्यात आले. nप्रसिद्ध शास्त्रज्ञ ऑर्थर वुल्फ यांच्यावरून हे नामकरण करण्यात आले. केप्लर १६५८-बी या ग्रहाचा अभ्यास करताना ब्रह्मांडाच्या निर्मितीबाबतची नवी माहिती हाती लागण्याची शक्यता खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
प्रथमच इतका अभ्यास...
संशोधक श्रेयस विसाप्रगदा म्हणाले की, केप्लर १६५८-बी हा ग्रह ज्या गतीने सूर्याच्या दिशेने निघाला आहे, तोच वेग कायम राहिला तर ३० लाख वर्षांपेक्षा कमी कालावधीत हा ग्रह सूर्याला धडकण्याची शक्यता आहे.
सूर्यासारख्या ताऱ्याच्या जवळ जाणाऱ्या व त्याला धडक देण्याची शक्यता असलेल्या एखाद्या ग्रहाचा खगोलशास्त्रज्ञांनी प्रथमच इतक्या बारकाईने अभ्यास सुरू केला आहे.