मनिला- फिलिपिन्स हा देश पुन्हा एका बॉम्बस्फोटानं हादरला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी दक्षिण फिलिपिन्सममधल्या एका द्विपावरच्या चर्चवर निशाणा साधला आहे. या चर्चमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटानं 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात दहशतवाद्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वीच या भागात मुस्लिम प्रांत व्हावे म्हणून लोकांनी मतदान केलं होतं.राष्ट्रपतींचे प्रवक्ते सल्वाडोर पनेलो म्हणाले, या हल्ल्याच्या सूत्रधारांचा आम्ही लवकरच शोध घेऊ, कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही गय केली जाणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात दहशतवादी संघटना इसिसनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात 5 सैनिक, तटरक्षक दलाचा एक जवान आणि 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 83हून अधिक लोक जखमी आहेत.ख्रिश्चनबहुल असलेल्या फिलिपिन्सच्या दक्षिण क्षेत्रात कायम दहशतवाद्यांचा धुमाकूळ सुरू असतो. आताही कॅथेड्रल चर्चमधल्या आतमध्ये हा बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटानं चर्चाच्या खिडक्यांचाही चक्काचूर झाला. तिथेच अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. बॉम्बस्फोट झाला तिथे बैठक सुरू होती. चर्चमधल्या झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बाहेरही बॉम्बस्फोट झाला आहे, ज्यात अनेक सैनिकांचा मृत्यू झाला आहे. जखमींना तात्काळ मदत करण्यासाठी आलेले सैनिक दुसऱ्या बॉम्बस्फोटाचे शिकार झाले आहेत. या दोन बॉम्बस्फोटांमुळे चर्चचं मोठं नुकसान झालं आहे. आठवड्याभरापूर्वीच दक्षिण फिलिपिन्सला मुस्लिमबहुल भाग घोषित करण्यासाठी एक जनमत संग्रह घेण्यात आलं होतं. अनेकांनी या जनमताच्या बाजूनं कौल दिला होता. जेणेकरून दहशतवाद्यांचा उपद्रव कमी होईल. परंतु जनमत संग्रहानंतही दहशतवाद्यांचा धुमाकूळ सुरूच आहे.
बॉम्बस्फोटानं हादरलं फिलिपिन्स, चर्चमध्ये झालेल्या स्फोटात 18 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 8:18 AM