नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना इंडिया-यूके अचिव्हर्स ऑनर्सद्वारे लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सम्मानित करण्यात आले. अर्थकारण आणि राजकारणातील जागतिक पातळीवरील योगदानाबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. लंडनमध्ये हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, हा पुरस्कार घेण्यासाठी स्वत: डॉ. मनमोहनसिंग प्रकृती स्वास्थतेमुळे पोहोचू शकले नाहीत. राष्ट्रीय भारतीय विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघ (NISAU) युके द्वारा दिल्लीत डॉ मनमोहन सिंह यांच्याकडे हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ. मनमोहन सिंह हे 2004-2014 या १० वर्षांच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. भारतात ब्रिटिश काऊंसील आणि युकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागसोबत (डीआईटी) संलग्नित राष्ट्रीय भारतीय विद्यार्थी और माजी विद्यार्थी संघ यूकेद्वारे इंडिया-युके अॅचिव्हर्स अवॉर्डचे आयोजन करण्यात येते. ब्रिटीश विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे सेलिब्रेशन करण्यात येते. याचवेळी, डॉ. मनमोहनसिंग यांना लाईफटाईम अॅचिव्हर्स अवॉर्ड देण्याची घोषणा करण्यात आली होती. ऑक्सफर्ड आणि केंब्रिज युनिव्हर्सिटीजमधील त्यांच्या अकॅडमीक यशाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
आपल्याला मिळालेल्या पुरस्कारानंतर डॉ. सिंग यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. या भावनांबद्दल मी आनंदी आहे, विशेष म्हणजे युवा वर्गाकडून या भावना येत आहेत, ज्या भारत आणि युके या दोन्ही देशांचं भविष्य आहेत. भारत आणि युके या दोन्ही देशांतील संबंध हे वास्तविक शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून घनिष्ट बनले आहेत. राष्ट्रपती महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरु, डॉ. आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या अनेक नेत्यांनी युकेत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर, ते देशातील महान नेते झाले. ही एक वारसा परंपरा आहे, जी भारत आणि जगातील देशांना प्रेरीत करते. त्यामुळेच, भारतातील असंख्य विद्यार्थ्यांना युकेत शिक्षणाची संधी मिळाली, असे डॉ. सिंग यांनी म्हटले आहे.