Pakistan Election 2023 | नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये नवीन वर्षात फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी मागील काही दिवस सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू होती. आता निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असल्याने जवळपास सर्वच उमेदवारांची यादी समोर आली आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सवेरा प्रकाश या महिलेचाही समावेश आहे. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानात निवडणूक लढणारी ती पहिली हिंदूमहिला ठरली आहे. प्रथमच हिंदूमहिला निवडणुकीच्या रिंगणात असल्याने सवेरा प्रसिद्धीच्या झोतात आली.
दरम्यान, पाकिस्तानात निवडणूक लढणारी सवेरा प्रकाश ही पहिली महिला असून, ती खैबर पख्तूनख्वाच्या बुनेर मतदारसंघातून मैदानात आहे. पाकिस्तानमधील राजकीय पक्ष पीपल्स पार्टीच्या तिकिटावर ती नशीब आजमावत आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, सवेराचे वडील ओम प्रकाश हे पेशाने डॉक्टर आहेत आणि नुकतेच ते निवृत्त झाले. ओम प्रकाश मागील ३५ वर्षांपासून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) सदस्य देखील आहेत.
५५ वर्षांत प्रथमच महिला उमेदवार सवेरा स्वतः एक डॉक्टर आहे आणि तिने २०२२ मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. याशिवाय ती बुनेरमधील पीपल्स पार्टीच्या महिला विंगची सरचिटणीसही राहिली आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणार असल्याचे ती सांगते. महिलांची समाजातील स्थिती सुधारण्यासाठी माझा लढा सुरू आहे, जर निवडणुकीत यश मिळाले तर गरीब आणि वंचितांसाठी काम करीन, असे आश्वासन तिने मतदारांना दिले. ५५ वर्षांत प्रथमच एक महिला उमेदवार बुनेर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, जिथून सवेराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.