लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ११० दिवसांपेक्षा अधिक वेळ एडनच्या आखातात हायजॅक केलेल्या व्यापारी जहाज रुएनला वाचविण्याचे ऑपरेशन भारतीय नौदलाने पूर्ण केले आहे. हे ऑपरेशन भारतीय किनारपट्टीपासून २६०० किमी इतक्या दूर अंतरावर करण्यात आले. या ऑपरेशनमध्ये ३५ सोमालियन समुद्री चाच्यांना (लुटेरे) ताब्यात घेण्यात आले असून, १७ क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या कारवाईतून हिंद महासागरात शांतता आणि स्थिरता मजबूत करण्याचा आणि चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडण्याचा नौदलाचा निर्धार दिसून येतो. या जहाजात अंदाजे ३७ हजार टन माल भरलेला असून, त्याची किंमत १० लाख अमेरिकन डॉलर (८.२ कोटी रुपये) आहे. या जहाजाला भारतात सुरक्षितपणे आणण्यात येणार आहे.
ऑपरेशनसाठी काय केली तयारी?
- येमेनच्या हौथी बंडखोरांकडून लाल समुद्रातील मालवाहू जहाजांवर वाढत्या हल्ल्यांनंतर नौदलाने जलमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी १०हून अधिक युद्धनौका तैनात केल्या आहेत.
- आयएनएस कोलकाता, आयएनएस सुभद्रा आणि सी गार्डियन ड्रोन या ऑपरेशनसाठी तैनात करण्यात आले होते. ऑपरेशनसाठी सी-१७ विमानातून खास मार्कोस कमांडोज उतरविण्यात आले होते.
अमेरिकेचे प्रत्युतर
अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, त्यांनी हौथी नियंत्रित प्रदेशात पाच ड्रोन नौका आणि एक ड्रोन नष्ट केले. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.
भारतीय युद्धनौकेवर गोळीबार अन्...
- नौदलाने सांगितले की, आयएनएस कोलकाताने बुधवारी सकाळी रुएनला रोखले आणि ड्रोनद्वारे जहाजावर असलेल्या सशस्त्र चाच्यांच्या उपस्थितीची खात्री केली. चाच्यांनी ड्रोन खाली पाडले आणि भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर गोळीबार केला.
- आयएनएस कोलकाताने जहाजाची स्टिअरिंग सिस्टीम आणि नेव्हिगेशनल मदतीला ठप्प करत तिची हालचाल बंद पाडली. यानंतर सी-१७ विमानातून मार्कोस कमांडोज खाली उतरले आणि जहाज ताब्यात घेतले.
- त्यांनी समुद्री चाच्यांना पकडले आणि १७ क्रू सदस्यांची सुटका केली.
बंडखोरांचा आणखी एका जहाजावर हल्ला
येमेनच्या हौथी बंडखोरांनी रविवारी पहाटे एडनच्या आखातात आणखी एका जहाजाला लक्ष्य केले. लाल समुद्राकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या जलमार्गावरील जहाजांना हौथी बंडखोर टार्गेट करत असून, यामुळे जगभरातील व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. एडन हे दक्षिण येमेनमधील एक शहर असून, येथे देशातील निर्वासितांचे सरकार आहे. हौथी बंडखोरांनी या भागात वारंवार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यामुळे एडनच्या आखातातून इंधन आणि इतर मालवाहू जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
- ०७ वर्षांत सोमालियाच्या चाच्यांपासून जहाजाची सुटका करण्याची ही पहिलीच कारवाई आहे.
- १४ डिसेंबर रोजी सोमालियन समुद्री चाच्यांनी या जहाजाचे अपहरण केले होते.
- २६०० किमी इतक्या दूर अंतरावर जाऊन कारवाई; ४० तास हे ऑपरेशन चालले.
- ३५ सोमालियन समुद्री चाच्यांना ताब्यात घेतले.
- १७ क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.